Thursday, June 01, 2017

आज भावे असायला हवे होते

-




-



|| अरविंद उवाच ||

आज भावे असायला हवे होते !

अरविंद विठ्ठल कुळकर्णी

          आज १२ एप्रिल म्हणजे भाषाप्रभू पुरुषोत्तम भास्कर भावे ह्यांची १०७ वी जयंती आहे ० केंद्रात नरेंद्र मोदींचे आणि उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथांचे सरकार प्रस्थापित झाले आणि प्रचंड बहुमताने लोकांनी त्यांना राजदंडधारी केले आहे हे पाहून भाव्यांना अमाप आनंद झाला असता ० पन्नासच्या आगेमागे जी आधुनिक मराठी लघुकथा आकारास आली तिच्या चार शिल्पकारांपैकी एक भावे ० तिसऱ्या पिढीचे सर्वश्रेष्ठ कादंबरीकार असे ना सी फडक्यांनी त्यांच्याविषयी म्हटले आहे ० तथापि भावे इतरांपेक्षा वेगळे ते त्यांच्या लघुनिबंधासाठी,शैलीसाठी आणि राजकीय मतांसाठी ० ' रक्त आणि अश्रू ' हा त्यांचा लेखसंग्रह , हे त्यांचे पहिले पुस्तक ,भाव्यांनी नागपुरात महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना लिहिले ० त्यातला प्रत्येक लेख आपल्या जिभेला शुद्धतेचे आणि अभिजातचेचे  वळण लागावे म्हणून आजही तोंडपाठ करण्यासारखा आहे . ' सहदेवा ,अग्नी आण !' हा निबंध तेव्हा अनेकांचा तोंडपाठ होता आणि आजही असेल ० तो वाचला की आपली स्वातंत्र्य चळवळ फाळणीच्या दिशेने निर्लज्जपणे कशी पुढे सरकत होती ह्याची स्पष्ट कल्पना येते ० आपल्या देशाचे दोन तुकडे होत आहेत आणि त्याला आपण स्वातंत्र्यप्राप्ती म्हणून उत्सव करीत आहोत ह्या परिस्थितीने भारतीय मन किती घायाळ आणि विव्हळ झाले होते ,होरपळून गेले होते हे समजण्यासाठी हे पुस्तक वाचले पाहिजे ० फाळणीच्या दिवसात भावे स्वतः: बंगालमधील नौखालीला वास्तव्य करून होते ० आपण स्वातंत्र्य मिळवीत आहोत पण त्याची कोणती किंमत देऊन ते पदरात पाडून घेत आहोत ह्याची गणती करण्यासाठी एका गावातून दुसऱ्या गावात ते पायपीट करीत होते ०  अत्याचारित हिंदू माताभगिनींची विचारपूस करण्यासाठी हा पस्तिशीतला मराठी लेखक त्यावेळी नौखालीला  धावून गेला होता .० त्यांचे ' घायाळ ' आणि ' नौका ' हे दोन कथासंग्रह वाचले की काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढलेल्या स्वातंत्र्य आंदोलनात हिंदूंनी काय भोगले ह्याची थोडीशी कल्पना येऊ शकते ०

          योगी आदित्यनाथ मार्च २०१७ मध्ये उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री झाले ही घटना , भावे जिवंत असते तर त्यांचे हातून मराठी साहित्याचा मानदंड ठरावा असा आणखी एक स्फूर्तिदायक लेख लिहिला जाण्यास कारणीभूत ठरली असती ० राजकार्यधुरंधर कषायवस्त्रधारी निरिच्छ साधू उत्तर प्रदेशाचा राज्यशकट हाकणार आहे ह्या कल्पनेने हिंदू भावविश्वास झालेला आनंद भाव्यांनी सौष्ठवाची पराकाष्ठा करीत शब्दबद्ध केला असता ० औरंगजेबाने मशिदीत रूपांतर केलेले काशी विश्वनाथाचे मंदिर आदित्यनाथांनी पुन्हा खणखणीत स्वरूपात बांधून काढावे म्हणून आवाहन करणारा लेख त्यांनी लिहिला असता ० काशी विश्वनाथावर भाव्यांनी १९५९ मध्ये दोन लेख लिहिले ते त्यांच्या ' वाघनखे ' ह्या अप्रतिम पुस्तकात समाविष्ट आहेत ०

          हिंदुमहासभा नेते वि घ देशपांडे ह्यांनी कशी विश्वनाथाचे मंदिर हिंदूंना पुन्हा मिळावे म्हणून सत्याग्रह केला तेव्हा त्यावेळच्या काँग्रेस शासनाने त्यांना नुसते अटक केले नाही तर अत्यंत अपमानित केले ० त्याने चिडून भाव्यांनी लिहिले ," ज्या राज्यकर्त्यांनी शेख अब्दुल्लाची त्याच्या नामधारी बंदिवासात जावयासारखी बडदास्त ठेवली ,त्यांनी देशपांडे ह्यांना सश्रम कारावास बहाल केला ० हैदराबादचे रझाकारी मंत्री मीर लायकअली ह्यांना आमच्या अहिंसक राज्यकर्त्यांनी असेच बंगलेदार चैनीत ठेवले होते ० तेथून  ते सहकुटुंब आमच्या  हातावर तुरी देऊन पापस्तानात पळून गेले ० हिंदू प्रजेवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या आणि अखेर आमच्याशी प्रत्यक्ष युद्ध पुकारणाऱ्या निझामाची आम्ही न्यायासनासमोर प्रकट चौकशी करावयास पाहिजे होती ; व देशद्रोह , बड ,अत्याचार ह्यासाठी जे कुठले कडक शासन निर्बंधाने सांगितले असेल ते त्यास द्यावयास हवे होते , परंतु त्याऐवजी आम्ही निझामास राजप्रमुखपद दिले ० या अमाप संपत्तीचे धनित्व बहाल केले ० "

          भावे म्हणतात, " जातीय जहराने रोमरोमात जळणाऱ्या व हिंदुस्तानच्या एकतेवर विभाजनाचा सुरा चालविणाऱ्या लीगी पुढाऱ्यांची एक पिढीच्या पिढी आज काँग्रेसने जोपासली व जवळ केली आहे ; मोठया सन्माननीय साळसूदपणे ही देशद्रोही व धर्मवेडी माणसे आज काँग्रेसजनांच्या मांडीला मांडी लावून बसली आहेत ० ह्याच काँग्रेसच्या राज्यात श्री वि घ देशपांडे व श्री ह भा भिडे ह्यांच्यासारख्या सज्जनांची ससेहोलपट चालू आहे ० "

          भावे लिहितात," श्री काशीविश्वनाथ मंदिरावर आक्रमण झाले ० मंदिराची मशीद बनवली गेली ० हिंदूंची वास्तू त्यांच्यापासून अन्यायाने छिनावली गेली ० असे जर आहे तर ज्याची वस्तू त्याला परत दिली गेलीच पाहिजे ० हा धर्मजातीपंथनिरपेक्ष न्यायाचा प्रश्न आहे ० हा अन्याय तीनशे वर्षांपूर्वी झाला म्हणून त्या अन्यायाचा काही न्याय होत नाही ० पोर्तुगीजांनी गोवे चारशे वर्षांपूर्वी बळकावले म्हणून काही गोवे पोर्तुगीजांचे होत नाही ० इंग्रजांनी हिंदुस्थानावर दीड शतक राज्य केले म्हणून हिंदुस्थान काही इंग्रजांचा होत नाही ० मूळ वस्तू कोणाची आणि ती छिनावली कोणी ह्याचाच काय तो विचार झाला पाहिजे ० हा न्याय जातीधर्मातीत असला पाहिजे ० शेख अब्दुल्लासारख्या पंचमदळ्याला तुरुंगात देखील अमर्याद सवलती ,कारण तो मुसलमान ; व डॉ शामप्रसादसारख्यांच्या तुरुंगातील मृत्यूची चौकशी नाही , कारण ते हिंदू ० ह्या प्रकारची उफराटी जातीयता ह्या विषयात अनुभवास येत कामा नये ० पण प्रत्यक्षात होत मात्र तसेच आहे ० न्यायाने जे काही सिद्ध आहे ते प्रस्थापित करण्याइतका प्रामाणिकपणा व धैर्य काँग्रेस शासनात नाही ० कारण न्यायाने पाहता भ्रष्टवून बळकावलेली ती वास्तू हिंदूंचीच आहे ०  हिंदूंची वास्तू हिंदूंना परत मिळणे हाच धर्म आहे ० हाच न्याय आहे ० .मानवता व नीतीही ह्यातच आहे ० परम सत्य असे आहे की श्री काशीविश्वनाथ हा ह्या देशाचा मानबिंदू आहे ० ते ह्या देशातील राष्टकांचे पूजास्थान आहे ० आमच्या असंख्यात पूर्वजांनी अगणित वर्षे श्रीकाशीविश्वनाथाच्या नावाने भक्तिपूर्वक जयघोष केले आहेत ० हा ढळलेला मानबिंदू पुनश्च सुप्रतिष्ठित व्हावा अशी वांच्छा त्यांनी बाळगलेली आहे ० श्रीकाशीविश्वनाथावर पडलेला घाव हिंदूंच्या मर्मावर गेला आहे ० कारण तो घाव त्यांच्या धर्मावर ,गौरवावर,परंपरेवर होता ० तो घाव त्यांच्या न्यायावर, संस्कृतीवर,मानवतेवर पडलेला घाव होता ० "

          भावे विचारतात ," ह्या भूमीत अखेर विजयी व्हावयाचे कोणी ? न्यायाने की अन्यायाने ? आक्रमणाने की अनाक्रमणाने ? अत्याचाराने की अनत्याचाराने ? असहिष्णुतेने की सहिष्णुतेने ? देववृत्तीने की पशुवृत्तीने ?  ह्याचाच निर्णय श्रीकाशीविश्वनाथाच्या साक्षीने आम्हास लावावयाचा आहे ० जे औरंगजेबाने केले त्यासच आम्ही अमरपट्टा देणार आहोत काय ? ज्यांनी मानबिंदू सोडले ,मानमर्यादा मोडल्या , देश बुडविला, धर्म बुडविला इहलोक बुडविला आणि परलोकही बुडविला त्यांचीच पतित परंपरा आम्ही पाळणार आहोत काय ? आम्ही पशूतेस वंश होणार आहोत काय ? धर्मांधतेसमोर नमणार आहोत काय ? श्रीकाशीविश्वनाथाची भूमी ललकारून हेच प्रश्न आम्हास विचारीत आहे ० "

           भावे शेवटी विचारतात , " श्रीकाशीविश्वनाथाच्या रूपाने ह्या देशातील न्याय, नीती व धार्मिक स्वातंत्र्य इरेस पडलेले नाही काय ? तो केवळ हिंदूंचाच नव्हे तर साऱ्यांचाच मानबिंदू नव्हे काय ? ह्या मानबिंदूचे पुनर्निमाण व पुनरुत्थान हे ह्या देशातील साऱ्यांचेच कर्तव्य नव्हे काय ? "

          "  जय बाबा विश्वनाथ " ह्या दुसऱ्या  एका लेखात भावे म्हणतात , " प्रत्यक्ष स्मशानात संसाराचे सिंहासन मांडून बसलेल्या महादेवाचा हा देश आहे ० त्या महादेवाचे एकनिष्ठ भक्त ह्या विपरीत काळातही पुकारून ललकार देत आहेत - "जय बाबा विश्वनाथ ! जय बाबा काशिनाथ !! ० पराभवाचा विजय बनवणारा हा मंत्र आहे ० अधर्मातून धर्माकडे नेणारा हा मंत्र आहे ० ह्या भूमीच्या अमर परंपरेचचा हा मंत्र आहे ० हा मंत्र मृत्युंजय महादेवाचा आहे ० अत्याचारी पापास मोक्ष देणारा हा मंत्र आहे ० ह्या मंत्राने चंद्रगुप्त घडविला ० ह्या मंत्राने विक्रमादित्य आकारास आणला ० शिवखङग अभिमंत्रित करणारा हाच तो मंत्र ० मराठ्यांचे धर्मसिंहासन ह्याच मंत्राने भारलेले होते ० हा संजीवक मंत्र ह्या भूमीत युगायुगातून आळविला गेला ० हाच मंत्र काशीविश्वनाथाचे यांत्रिक आजही आळवीत आहेत ० " जय बाबा विश्वनाथ ! " , " जय बाबा काशिनाथ ! " , " हर हर महादेव ! "

          विस्तारभयास्तव हा सगळं लेख येथे देता येत नाही. तो मुळातून वाचला पाहिजे आणि पाठ केला पाहिजे ० त्याचे सामूहिक पठण झाले पाहिजे ० आज पुरुषोत्तम भास्कर भावे असते तर त्यांनी योगी आदित्यनाथांना भरभरून पाठिंबा दिला असता आणि त्यांचा कार्यकाळ यशस्वी व्हावा म्हणून लेखणी झिजविली असती ० ती परंपरा यथाशक्ती आपल्याला चालवायची आहे ० महाराष्ट्रातील आणि उत्तर प्रदेशातील जनता जर एकवटली तर असे कार्य उभे राहील जेणेकरून भारतवर्षाचे  सुख ,समृद्धी आणि शांतता प्रतिपदेच्या चंद्रलेखेप्रमाणे वर्धिष्णू होत राहील ० अस्तु ०

No comments: