Friday, September 24, 2010

महिला आरक्षणाच्या निमित्ताने

आऊट ऑफ बॉक्स !
Date 19/03/2010 05:00 Author - लीना मेहेंदळे Hits 112 Language Global
Print Print
PDF PDF
RSS Feeds RSS Feeds
समाजपटलावर अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे अजूनही स्त्रियांचा प्रवेश होणे बाकी आहे. चौदा वर्षांनंतर महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. ज्या क्षेत्रांमध्ये महिलांचा शिरकाव कालपर्यंत झालेला नव्हता त्या क्षेत्रांमध्ये नव्या संधी उपलब्ध होण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे असे वाटते. तसे बघायला गेले तर असे अनेक कोपरे आहेत जे अजून शिल्लक आहेत आणि ज्यांच्याबद्दल आपल्याकडे अजूनही चर्चा होताना दिसत नाही.
'बायकांचे काय काम' हा दृष्टीकोन अनेक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या पुरुषांच्या मनात असतो. राजकारण हे त्यातले एक क्षेत्र झाले पण डिफेन्स मिनिस्ट्री आहे, रॉ सारखी संस्था आहे, सीआयआय; म्हणजेच कन्फ्रीड्रेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज, ऑईल ऍण्ड नॅचरल गॅस, न्यूक्लीयर रिसर्च, थर्मल पॉवर इथपासून ते थेट बुध्दिबळाच्या खेळापर्यंत अनेक क्षेत्रे आहेत जिथे आजही स्त्रीयांच्या शिरकावाला फारसे प्रोत्साहन दिले जात नाही. बायका पोचू शकत नाहीत.रॉच्या इंटेलिजन्स विंगमध्ये स्त्रीया काम करु शकत नाहीत का? किंवा बुध्दिबळाच्या स्पर्धा पुरुष खेळाडू विरुध्द स्त्री खेळाडू अशा होऊ शकत नाहीत का? होऊ शकतात. कारण तिथे शारिरीक क्षमतांचा प्रश्नच नाहीये. पण असा विचार आपण करतच नाही. अशा शक्यता पडताळूनही पाहण्याची आपली तयारी नसते. असे का? माझ्याच आयुष्यातल घडलेल्या प्रसंगाबद्दल मला सांगायला जरुर आवडेल, मसुरीला असताना बुध्दिबळाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मीही स्पर्धेसाठी नाव नोंदवले होते. पण लवकरच मला नाव मागे घे असे सांगण्यात आले. कारण विचारल्यावर इतर प्रोबेशनवर असणाऱ्या स्त्रीयांपैकी कुणीच स्पर्धेत भाग घेतला नव्हता, अशावेळी मी कुणाशी स्पर्धा करायची असा प्रश्न संयोजकांना पडला होता. बुध्दिबळासारख्या खेळात शारीरिक सामर्थ्याची अवश्यकता नसते. अशावेळी स्पर्धा स्त्री आणि पुरुष यांच्यात होऊ शकत नाही का असे मी मांडल्यावर त्यावर बराच काथ्याकुट झाला. आणि मला नाव मागे घेण्याबद्दल पुन्हा पुन्हा सुचवण्यात आले. मीही मग इरेस पेटले होते. त्या स्पर्धेत जो पुरुष खेळाडू प्रथम येईल त्याने माझ्याशी खेळावे, मला हारवावे आणि मगच त्याला त्याचे बक्षिस देण्यात यावे असे थेट आव्हानच मी देऊन टाकले. त्यावरही पुन्हा बरीच चर्चा झाली आणि शेवटी त्यांनी मला स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिली.
एवढे सगळे सांगण्याचे कारण, बुध्दिबळासारख्या खेळातही स्त्री विरुध्द पुरुष अशा स्पर्धेचा विचार होत नाही. होत नाही कारण तशी शक्यता असू शकते हेच आपण गृहीत धरत नाही.
मला वाटते, दृष्टीकोनात बदल होणे अत्यंत अवश्यक आहे. स्ट्रॅटेजी प्लॅनिंग, लाँगटर्म प्लॅनिंग सारख्या गोष्टी स्त्रीया अतिशय कुशलपणे करु शकतात. पण 'त्यांना काय येतं?' या दृष्टीकोनाबाहेर जोवर विचार होत नाही तोवर बदल होणर नाहीत. स्त्रियांमध्ये असणाऱ्या क्षमतांचा आणि कौशल्यांचा विचारच आपल्याकडे केला जात नाही. जी बाई घर सुस्थितीत चालवू शकते, घराचे नियोजन चोख बजावू शकते तिच्यात 'मॅनेजरीयल' कौशल्ये नक्कीच पक्की असणार..पण होममेकर असणाऱ्या स्त्रीबद्दल या दृष्टीने बघायला समाज तयार नाहीये, असा विचार करण्याचे धैर्य समाजत दिसत नाही; अजूनही !
राजकारणाचे म्हणायचे झाले आता टप्पा बराचसा सोपा होईल. पंचायत राज मध्ंये आरक्षण आहे, त्याचे परीणाम आपल्या समोर आहेत. महिलांच्या राजकारणातील पदापर्णामुळे राजकारणाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात बराच बदल होईल. राजकारणाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात 'प्रगल्भता' येऊ शकते. ज्याप्रमाणे राजकारणात स्त्रीच्या प्रवेशासाठी वातावरण निर्मिती करण्यात आली, त्यादिशेने विशेष प्रयत्न करण्यात आले तोच दृष्टीकोन इतरही क्षेत्रांच्याबाबतीत राखणे अत्यंत गरजेचे आहे.
वेगळया वाटेची उर्मी !
स्त्रीकडे काही विशेष कौशल्ये आहेत, ज्यांचा व्यावसायिक पातळीवर खुप चांगल्या पध्दतीने वापर करता येऊ शकतो. त्यातली सगळयात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे, स्त्रीची विचार करण्याची पध्दत पुरुषापेक्षा पुष्कळच निराळी असते. पुरुष बऱ्यापैकी चाकोरीबध्द विचार करतात. जो रस्ता माहितीचा आहे, चार वेळा ज्या मार्गावरुन इतरांनी ये-जा केलेली आहे असाच मार्ग निवडण्याकडे पुरुषांचा कल असतो. त्याउलट स्त्रीया नेहमीच पर्यायांचा विचार पुरुषापेक्षा खुप जास्त आखिवरेखीव पध्दतीने करु शकतात. त्यांना एकाच गोष्टीसाठी असंख्य पर्याय सुचू शकतात. त्या पर्यायांचा गांभीर्याने त्या विचार करु शकतात. त्यातले कुठले पर्याय वापरण्याजोगे असू शकतात हे ठरवण्यासाठीचे व्यवहारीक ज्ञान त्यांच्याजवळ असते.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, स्त्रीमध्ये उपजतच वेगळया वाटेने जाण्याची उर्मी असते. निराळे काहीतरी करुन बघण्याची क्षमता आणि इच्छा तिच्यात प्रबळ असते. 'आऊट ऑफ बॉक्स' विचार करण्याची तयारी असते. या गोष्टी नैसर्गिकपणे स्त्रीयांमध्ये असतातच. त्यांच्यात पेशन्स खुप जास्त असतो. आजुबाजूच्या परीस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांची तयारी असते. तशी लवचिकता त्यांच्यात असते. या सगळयाच क्षमतांचे व्यावसायिक पातळीवरील महत्व निराळे सांगण्याची अवश्यकताच नाही.
आक्षेपांचे काय?
घराबाहेर पडून काम करणाऱ्या स्त्रीच्या बाबतीत एक आक्षेप नेहमीच घेतला जातो आणि तो म्हणजे लग्न झाल्यानंतर, मूल झाल्यानंतर तिचे अग्रक्रम बदलतात. आक्षेप बरोबर आहेत कारण नैसर्गिकपणे तिच्याशीच कुटुब अधिक जोडले जाते. मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारीही तिच्यावरच येऊन पडते. पण या आक्षेपाला आजून एक बाजू आहे असे मला वाटते. पुरुषाचे लग्न झाल्यानंतर त्याचे अग्रक्रम बदलतात का? नाही बदलत. का नाही बदलत? कारण ते तसे बदलायला पाहिजेत अशी त्याच्याकडून अपेक्षाच केली जात नाही. असे का? कारण आपल्या कुटुंब रचनेत आपण आपल्या घरातल्या मुलांना हे सांगतच नाही की लग्नानंतर तुझ्या जबाबदाऱ्या बदलणार आहेत. तुला तुझ्या बायकोच्या बरोबरीने घरात काम करावे लागणार आहे. पुरुषांमध्ये या क्षमता वाढायला नकोत का? बायकांकडून नवीन कौशल्ये आत्मसात करण्याबाबत आपण नेहमीच चर्चा करतो पण नव्या जगात जिथे घरातली स्त्री पुरुषाच्या बरोबरीने बाहेर पडून काम करते आहे तिथे त्या स्त्रीच्या कामातली काही कामे उचलण्याचे कौशल्य पुरुषाला यायला नको? सगळीच अपेक्षा आपण बायकांकडूनच का करतो? लग्नानंतर पुरुषाचे व्यवहार आहेत तसे चालू राहतात मग हा दोष बायकांचा कसा काय?
त्याचबरोबर 'होममेकर' असणाऱ्या ज्या स्त्रीया आहेत, ज्या पूर्णवेळ घरासाठी देतात, ज्यांच्या आधाराशिवाय घर उभे राहणे शक्य नसते त्यांच्या कष्टाची किंमत घरातल्या पुरुषाला किंवा इतर सदस्यांना असते का? पुरुष घराबाहेर पडतो, त्यामुळे त्याचे अनुभव विव संपन्न असते असे आपण म्हणतो, जर समानतेबद्दल आपण बोलत असू तर समृध्द अनुभव विव हा स्त्रीचाही अधिकार आहेच ना ! तिला घरात आपण आदराचे आणि सन्मानाचे स्थान देतो का? यातल्या कुठल्याच गोष्टी न करता, स्वत:च्या क्षमता 'अपडेट' न करता फक्त स्त्रियांवर आक्षेप घेणे योग्य आहे असे मला वाटत नाही.
पुरुषबहुल व्यवस्थेत काम करताना..
स्त्रियांना पुरुषबहुल व्यवस्थेतच काम करावे लागते. अशावेळी काही गोष्टींचा स्त्रिने अग्रक्रमाने विचार करणे अवश्यक असते. त्यातली सगळयात पहिली आणि महत्वाची बाब म्हणजे स्वत:च्या कामाशी चोख असणे. आपल्याला दिलेले काम प्रामाणिकपणे आणि चोख बजावणे फार गरजेचे आहे. तुम्ही कामत चोख असाल तर कुणीही तुमच्यावर बोट उगारु शकत नाही. स्त्रीयांच्या संदर्भात दुसरी समस्या असते ती शोषणाची. मानसिक, आर्थिक, सामाजिक, लैंगिक शोषण ही समस्या खुप मोठी आणि जटील आहे. ती एका फटक्यात सुटण्यासारखी नाही. कदाचित ज्यावेळी नवे बदल होतात, नव्या क्षेत्रात स्त्री पदार्पण करते तिचे शोषण होण्याच्या शक्यता वाढीस लागू शकतात. म्हणून या समस्यांवर उत्तर शोधणे आणि स्त्रियांना आत्मनिर्भर बनवून, सक्षम बनवणे सगळयात महत्वाचे आहे.
- लीना मेहेंदळे
शब्दांकन : मुक्ता चैतन्य
muktachaitanya@oorja.co.in
सोजन्य : लोकमत