Tuesday, September 11, 2018

चीन ग्रेट लीप फॉरवर्ड प्रभाकर देवधर

प्रभाकर देवधर
जून १९८३ला सकाळी मी बेजिंगच्या भव्य तीयानांमेन चौकातील मओत्सेतुंग यांच्या समाधीस्थळात प्रवेश केला. विविध प्रांतातून आलेल्या अबलावृध्द चीनी लोकांच्या आणि परदेशी पर्यटकांच्या भल्यामोठ्या रांगेत तासभर उभा होतो. सजवेल्या काचेच्या पेटीत चीनच्या झेंड्याने झाकलेल्या माओंच्या मेणाच्या पुतळ्यासम दिसणाऱ्या मृत देहाकडे पाहत असतांनाच माझ्यामागे उभ्या असणाऱ्या चीनी वृध्द स्त्रीच्या चेहेऱ्याकडे लक्ष गेले. देवदर्शन घेत असल्यासारखा त्या चेहऱ्यावरचा भाव बघून माझ्या लक्षात आले की माओत्सेतुंग आजही चीनी मानसात देवत्वाच्या स्थानावर आहेत. नंतर पुढे अनेक वर्षे विविध वेळी चीनी व्यक्तींशी गप्पा करताना हाच अनुभव आला. अनेकवेळा टॅक्सीतून प्रवास करताना ड्रायव्हरने आदराने लावलेला माओंचा फोटो किंवा छोटा पुतळा डॅशबोर्डवर विराजमान झालेला मी पाहिलाय. आपल्याकडे महात्मा गांधींना देव मानणारे आज कोणी असतील असे वाटत नाही! 
सध्याच्या चीनी सरकारच्या कुठल्याही सरकारी निवेदनात किंवा कार्यक्रमात माओंना स्थान नसते. चीनी चलनी नोटांवर आज माओंची छबी आहे एवढेच. पण आज चीनी वृत्तपत्रात किंवा चीनी पुढाऱ्यांच्या बोलण्यात किंवा पोशाखात कुठेही माओंच्या विषयी कोठलीच निशाणी दिसली नाही. असे असले तरी चीनी समाजात,विशेषतः वयस्क सामान्य नागरिकांच्या मनात खोलवर माओविषयी मोठी आदर भावना आजही जागरूक आहे या बाबत मला शंका नाही. त्यांच्या मनात आजही ते चीनचे 'अखेरचे सम्राटआहेत. चीनी समाजमाध्यमात तरुण मंडळी माओंच्या बद्दल अनेक वैचारिक चर्चा करत असतात. चीनमध्ये पुन्हा एकदा माओंच्या अतिडाव्या विचारांनी थोडाफार जोर धरला आहे. ग्रेट लीप फॉरवर्ड आणि कल्चरल रेव्होल्युशनच्या १०-१२ वर्षांच्या काळात माओंच्या चुकीच्या योजनांमुळे झालेले हाल आणि अगणित मृत्यू हे काही लोक विसरायला तयार आहेत असे दिसते.
शाओशान हे माओंचे जन्मस्थान. आज तर ते मोठे तीर्थक्षेत्र बनले आहे. १९८०च्या दशकात केवळ ६० हजार लोकांनी त्याला भेट दिली. २०१५ साली १६० लाख चीनी लोक  आणि पर्यटक शाओशानला माओंच्या अतिसाध्या माओत्सेतुंग मेमोरियलच्या भेटीला आले! ती संख्या दरवर्षी वाढतेच आहे.
पंचवीस वर्षांच्या कष्टमय आणि सशस्त्र संग्रामाचे नेतृत्व करून माओंनी निर्माण केलेल्या चीनच्या कम्युनिष्ट सरकारचेपीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचेते शिल्पकार आहेत असे सारे चीनी लोक मानतात. त्यासाठी माओंनी केलेला स्वार्थत्याग आणि पराक्रम लोक विसरलेले नाहीत. माओंच्या प्रमाणेच हिटलर,स्टालिन आदी हुकुमशाहांच्या काळातही त्यांच्या देशात फार मोठ्या संख्येने नागरिक मारले गेले. पण १५ ते वीस कोटी चीनी लोक मारले गेले असुनही इतर हुकुमशहाप्रमाणे आजचा चीनी सामान्य समाज माओंना दोष देतांना दिसत नाही. माओंच्या देश आणि समाज बांधणीच्या कार्याकडे लोक जास्त महत्व देतात. आज लोक माओंच्या कार्याच्या या दुसऱ्या बाजूची चर्चा करत आहेत. चीन जेंव्हा स्वतंत्र झाला त्यावेळी चीनी समाजाची परिस्थिती काय होती?   
१९५०च्या पूर्वी चीनमध्ये प्रचंड गरिबी थैमान घालत होती. शेती उत्पादन पुरेसे नव्हते. जेमतेम १५ टक्के लोकांना लिहिता वाचता येत होते. जमीनदार आणि सावकारांची मनमानी आणि अत्याचार चालू होते. माओंची सत्ता आल्यावर या दोन्ही समाज शत्रूंचा पूर्ण नायनाट करण्यात आला. देशातील अशा लाख्खोंना कंठस्नान घालण्यात आले. लोकांचा त्यांचा करवी होणारा छळ थांबला. शाळा सुरु करून शिक्षणाची सक्ती केली गेली. केवळ १२ वर्षात साक्षरतेचे प्रमाण ४५ टक्क्यावर पोहोचले. तरुण मुलामुलींमधील साक्षरता तर ७० टक्के इतकी वाढली. तोच आज चीनच्या प्रगतीचा पाया ठरला आहे.
चीनच्या विविध भागात निरनिराळ्या बोल भाषा होत्या. एक प्रांतातील माणसांना दुसऱ्या प्रांतातील व्यक्तीशी संबंध ठेवणे शक्य नव्हते. माओनी सर्व देशभर मॅडारीन भाषेची सक्ती केली. सारे शालेय शिक्षण त्या भाषेत सक्तीचे केले. त्यामुळे आज सारा चीन एक भाषी राष्ट्र बनला आहे. १९५०मध्ये चीन मध्ये उद्योगधंदे जवळजवळ नव्हतेच. माओंनी सोविएट रशियाच्या मदतीने अनेक लहानमोठे औद्योगिक प्रकल्प सुरु केले. पहिल्या १५ वर्षात १० हजारावर घरणे आणि बांध घालून शेती उत्पादनात प्रचंड वाढ केली. जवळजवळ अंधारात असलेल्या चीनमध्ये ठिकठिकाणी वीज निर्माण केली गेली. देश थोडाफार उजळून गेला. माओंनी चीनला एका आत्मनिरभ्रर स्वतंत्र राष्ट्राचे स्वरूप दिले. या संक्रमणात काही बळी जाणे अपरिहार्य होते असे आज मानले जाते. १९५० साली चीनमधील राष्ट्रीय आयुर्मान ४० वर्ष होते. माओंच्या पहिल्या पंधरा वर्षात ते ६५ झाले. सर्व देशभर लसीकरण करून रोगराई सीमित केली. एकचालकत्व असल्याने सामाजिक शिस्त लादून झपाट्याने देश प्रगती करू शकला. त्यांनी घालून दिलेली सामाजिक शिस्त हे चीनच्या आजच्या प्रगतीचे मूळ आहे. त्याशिवाय ही मन थक्क करणाऱ्या गतीने होत असलेली चीनची सार्वांगीण प्रगती होऊच शकली नसती. लादलेली सामजिक शिस्त आणि प्रगतीचे हे नाते आपणही १९७६च्या इमरजन्सीच्या काळात अनुभवले आहे. 
डेंग शावपिंग यांनी सुरु केलेल्या निर्यात केंद्रित औद्योगिक प्रगती झपाट्याने मुळ धरू शकली याचे श्रेय माओंनी प्रस्थापित शिस्तबद्ध सामाजिक व्यवस्थेला द्यावेच लागेल. शहरात नोकरीसाठी जाताना साऱ्या कुटुंबाला बरोबर न नेह्ता एकट्याने जाणे अशा सारखे निर्बंध डेंग सरकार लादू शकले याचे श्रेय माओंना जाते. त्यामुळे आपल्या शहरातील दिसणारी माणुसकीला लाजवणारी झोपडपट्टी आज चीन मध्ये दिसत नाही. चीनमधील छोटी गावेही आज प्रगतीशील आहेत याचेही मुळ माओने लादलेल्या सामाजिक शिस्ती मध्ये आहे हे निश्चित.
अर्थात माओंचे सर्वात मोठे योगदान म्हणजे स्वतः सर्वात पुढे उभे राहून उमेदीने वीस वर्षाहून अधिक काल देशासाठी सशस्त्र लढा देत त्यांनी देशाला मिळवलेले स्वातंत्र्य. त्यामुळे सारा चीनी समाज माओंच्या साऱ्या गंभीर चुकांना विसरायला तयार आहे. चीन मधील आजच्या उजव्या कम्युनिष्ट सरकारला माओंचे ऋण मानावेच लागेल.