Tuesday, March 06, 2007

3/ माय मराठीत विज्ञान आणि कायदा

माय मराठीत विज्ञान आणि कायदा
दैनिक सकाळ
दिनांक २.६.९६

महाराष्ट्र राज्याची राजभाषा मराठी असूनही नाइलाजाने मराठी ऐवजी इंग्रजीचा वापर करावा लागतो असे म्हणणारी मंडळी मुख्यतः विज्ञान आणि कायदा या दोन विषयांबाबत मराठीला मर्यादा आहेत असे बोलतात. याबाबत माझे अनुभव वेगळे आहेत.

माझे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण हिंदी मधे झाले. म्हणजे भाषा म्हणून इंग्रजी उत्तम येत असली तरी शिक्षणाची भाषा हिंदीच होती. कॉलेजात गेल्यावर लक्षात आल की इथून पुढे शिक्षणाची भाषा इंग्रजी असणार. ते साठच दशक चालू होत. नुकतेच चीनी आक्रमणात आपण हरलेलो होतो. देशप्रेम या शब्दाच्या कक्षेत बसणा-या ज्या कांही भावना आणि विचार उचंबळू शकतात त्या सर्व माझ्या मनात येऊन गेल्या. आणि आपण इथून पुढे आपली शिक्षणाची भाषा हिंदीच ठेवायची- त्यासाठी वाटेत तितकी ज्यादा मेहनत करायची असा निश्चय केला.

याला पहिला सुरंग लागला तो आर्थिक प्रश्नाचा. फिजिक्स आणि केमिस्ट्रीची हिंदीतील पाठयपुस्तक विकत आणली पण त्याने समाधान होईना म्हणून इंग्रजी पुस्तक पण विकत आणावी लागली. गणिताच हिंदी भाषिक पुस्तक नव्हतच. पूरक पुस्तकं सगळी इंग्रजीतूनच उपलब्ध.

दुसरा तोटा असा होता कि ज्या  माझ्या आईवडिलांनी मॅट्रिक पर्यंत अभ्यासात मदत केली होती ते चक्क बाजूला झाले (लई हिंदी वाचलं, आता बस अशी भूमिका कारण त्यांच शिक्षण मराठीतून झालेल )

तरीही अशी पद्धत ठेवली कि ज्यादा तास लायब्ररीत बसायच. आठ-दहा इंग्रजी पुस्तकातून विषय समजून ध्यायचा. त्या पुस्कांच्या मदतीने तिथेच बसून इंग्रजीमध्ये नोट्स काढायच्या, मग घरी येऊन त्या हिंदीत भाषांतरित करून हिंदी नोट तयार करायच्या. वह्यांचा खर्च दुप्पट झाला. हा ज्यादा खर्च आपण घरावर टाकतो म्हणून इतर ब-याच वैयक्तिक बाबींवर तो कमी करायचा. असा दिनक्रम सुरू झाला.

वर्गात पुढे रहायच्या ईर्षेने पहिल्या तीन महिन्यातच निम्म्या अभ्यासक्रमाच्या माझ्या नोट्स दोन्ही भाषेत तयार झाल्या. तेंव्हा मला जाणवल की हे काम कांही फार कठीण नाही. त्याकाळी कॉलेजच्या पहिल्या दोन वर्षामध्ये पेपर हिंदीतून लिहिण्याची मुभा होती. त्यातल्या त्यांत कमी हुषार किंवा ज्यांना आपण आर्थिक कारणामुळे इंटर नंतर अभ्यास सोडून देणार आहोत हे माहीत असायचे  तीच मुल हिंदीतून पेपर लिहायची. पेपर तपासतांना त्यांच्या पेपरकडे पहाण्याचा परीक्षकाचा दुष्टीकोनही तसाच असायचा. शिवाय क्लास मधली लेक्चर्स इंग्रजीतून असल्यामुळे त्यांना विषय नीट कळत नसे. एकूण सर्व बाजूंनी पहाता त्यांची परीक्षेत घसरण होणार हे नक्की ठरलेल असायच.

तेंव्हा आम्हाला बसु नावाचे शिक्षक फिजिक्स छान शिकवायचे. एकदा त्यांनी फर्मान सोडले -- घरी काही स्वतःचा  अभ्यास करत असाल तर तपासायला आणून हजर करा, ट्यूटोरियलच्या वर्गात दहाच मुलं त्यांत माझी एकटीची हिंदीतली वही पाहून ते उखडलेच. आमची बरीच वादावादी झाली. एरवी तू बोर्डात नंबर काढशील कॉलेजचं नाव उंच करशील असं त्यांनी मला कळवळून सांगितलं. माझा बचाव एकच -- हिंदीतून शिक्षण घेण्यात खूप अडचणी येतील हे मान्य पण माझ्यासारख्या हुषार () मुलानीच त्यातून वाट नाही दाखवलीतर इतरांना ती वाट सोपी कशी होणार. शेवटी निव्वळ माझं हस्ताक्षर चांगल म्हणून माझ्या हिंदी नोट्स तपासून देण्याचं त्यांनी कबूल केल. पण त्यांचे मुद्दे संपत नव्हते. त्यांनी विचारल -- ठीक तू पेपरात ऍटमच भाषांतर काय लिहिणार                 या समीकरणाच भाषांतर कस लिहिणार मी सांगितल की समीकरण मी जसच्या तस इंग्लिशमधेच लिहीन आणि ऍटमच तरी भाषांतर करायची काय गरज -- मी चक्क सोडियमचा एक ---- व क्लोरिनचा एक ---- मिळून मिठाच एक ---------- बनतो असं लिहीन. यावर त्यांनी मला एक विचित्र नियम सांगितल-- जर एखाद्याला हिंदी भाषेत पेपर लिहायचा असेल तर ज्या ज्या इंग्रजी शब्दांची पर्यायी शब्दावली युनिव्हर्सिटीने घोषित केली आहे तिथे तिथे ते शब्दच वापरले पाहिजेत, तिथे इंग्रजी शब्द वापरले  तर मार्क कापले जातील. मग  ---- हा शब्द ऍटम असा देवनागरीत लिहून चालेल का त्याचही उत्तर नाही असच आहे. पुढे त्यांनी अजून एक वेगळा मुद्दा मांडला. ते म्हणाले -- कदाचित तू संपूर्ण शब्दावली पाठ करशील -- पण माझं काय आणि माझाही सोड -- मी तर बंगाली आहे, पण तुझ्या हिंदीभाषी शिक्षकांना सुद्धा पूर्ण शब्दावली पाठ येत नाही. अशावेळी आम्ही तुमचे पेपर काटेकोरपणे कुठे तपासणार -- सरासरीच्या हिशोबाने मार्क देऊन टाकू --  नाहीतरी हुषार विद्यार्थी हिंदीतून पेपर लिहीतच नाहीत.

मी विचारले -- हा नियम बदलता नाही का येणार -- जिथे सोईचा असेल तिथे मला तो शब्द इंग्रजीतून लिहायची परवानगी मिळवून द्या म्हणजे झालं. त्यावर त्यांनी प्रयत्न नक्की करीन पण कदाचित तुझ्या परीक्षेपर्यंत तो नियम बदललेला नसेल असं उत्तर दिलं. आमच्या कॉलेजकडून तसं पत्रही युनिव्हर्सिटीला गेल पण पुढे गाडी सरकली नाही -- मग मीही माझा आग्रह सोडून दिला आणि इंग्रजीकडे वळले. हिंदीमधे विज्ञान विषयक पुस्तके (विशेषतः पूरक पुस्तके) तयार झाली नाहीत आणि त्या भाषेचा ऱ्हास होत आहे त्याला मी(च) कारणीभूत आहे, मी त्यावेळी जिद्द दाखवली असती तर आज जगाच्या नकाशावर हिंदीचा बोलबाला झाला असता अशी माझी अजूनही ठाम खात्री आहे.

नोकरीत शिरल्यावर माझं पहिले वहिलं पोस्टिंग म्हणजे असिस्टंट कलेक्टर. त्यांत रेव्हेन्यू कोर्ट म्हणून खूप काम पहावं लागतं. रेव्हेन्यू, टेनेन्सी, वतन ऍबोलिशन ऍक्ट इत्यादि कित्येक कायद्यांखालीलकेसेसची सुनावणी करून निवाडा द्यावा लागतो. फक्षकार खेडोपाड्यातून येतात. आपली शहरी मराठीसुद्धा त्यांच्या दृष्टीने कोण अगम्य. मग इंग्रजी विचारायलाच नको. तर पुन्हा माझं देशप्रेम वगैरे उफाळून आलं.

मी माझे न्यायालयीन निकाल मराठीतून लिहायला सुरुवात केली.वकीलांनी ऑर्ग्युमेंट मराटीतून करायला सांगितली तर त्यांची प्रतिक्रिया दोन तऱ्हेची होती. कुणी बरे म्हणायचे, कुणी त्रासायचे. माझेसु्द्धा शंभर टक्के निकाल मराठीतून नसायचे पण खूपसे असायचे. तो युनिव्हर्सिटीत  नडलेला निेयम मी यावेळी धुडकवून लावू शकत होते. मला जिथे वाटे कि मराठी शब्द क्लिष्ट आहे तिथे मी िइंग्रजी शब्दच कधी रोमन तर कधी देवनागरीत लिहीत असे. कधी कधी एका भाषेतून निकाल लिहिताना एखादा पूर्ण उताराच दुसऱ्या भाषेतून उद्धृत करीत असे. पण माझी ही पद्धत पक्षकारांना कूप सोईची होती हे मला त्यांच्याकडूनच धन्यवादरूपाने कळत असे.

माझ्या निकाल दिलेल्या कित्येक केसेस हायकोर्टापर्यंत जाऊन आल्या आहेत. वकील सांगत की आम्हाला त्याची Authentic English copy करून घावी लागते. त्याचा भुर्दंड पक्षकारांना बसतो (कारण ते Authentic भाषांतर करण्याची फी पण मोठी असते). शिवाय त्यांतली कांही Authentic भाषांतरे मी बधितली आहेत आणि त्याबद्दल मी पूर्ण समाधानी नाही. कधी कधी माझ्या निकाला विरुद्ध ज्या अपेलेट कोर्टात केस गेली पण जिथे Authentic English copy देण्याचे बंधन नव्हते, तिथले वरिष्ठ अधिकारी मला म्हणत, मराठीतून कांय लिहिलेस? तो निकाल वाचून काढणे म्हणजे सुद्धा किती डोकेदुखी! म्हणजे पक्षकारांना सोईची पण अधिका-यांनी मात्र उगीचच गैरसोय मानून घेतलेली. पण याची दुसरीही बाजू आहे कित्येकदा कायद्याचा मुद्दा समजावून घेतांना मराठी मधले पुस्तकच अगम्य असायचे मग मूळ इंग्रजी वाचून काढावे लागे. अशावेळी तो सेक्शनच उद्धृत करावा लागला तर तो मी इंग्रजीतच करीत असे. पण मनांत खंत राहून जायची -- ही कायद्याची भाषआ सोपी का नाही करत. मी मराठीतून वाचलेली कायद्याची कित्येक कलमे अशी आहेत जी मी कितीतरी सोप्या पद्धतीने सोप्या भाषेत आणि ते ही कायद्याच्या मुद्देसूदपणाला धक्का न लागू देता लिहू शकते. म्हणूनच या दिशेने प्रयत्न व्हावेत असे मला वाटते.

तरीही असिस्टंट कलेक्टर हवेली, कलेक्टर सांगली आणि कमिशनर नाशिक या तीनही कार्यकाळात मला कोर्ट म्हणून भरपूर काम कराव लागल आणि मराठीत निकाल लिहिण कठिण नाही अस माझ ठाम मत आहे. आपण एखादं इंग्रजी वाक्य वाचतो- त्या वाक्याची व्याकरणीय मांडणी आपल्या डोक्यांत ठसलेली असते. मराठीचे व्याकरण नितांत वेगळे
आहे. तरीही भाषांतर करतांना आपण इंग्रजीतील शब्दांची माडणी आपल्या मराठी वाक्यांत जशीच्या तशीच ठेवायचा प्रयत्न करतो. मग ते मराठी वाक्य क्लिष्ट होत. एक उदाहरण पहा ' From all the evidence placed before me, I have come to a conclusion that- च भाषांतर 'जे सर्व पुरावे माझ्या पुढे ठेवण्यांत आले, त्यावरून मी अशा निष्कर्षाप्रत आले आहे की' - पण हेच भाषांतर वेगळया त-हेने करता येते- माझ्या समोर आलेल्या एकूण पुराव्यांवरून मला असे वाटते की -असे लिहिता येते. इंग्रजीतील conclusion   या शब्दाचं शब्दशः भाषांतर मराठी वाक्यात आलेच पाहिजे असा हट्ट असेल तर -मी असा निष्कर्ष काढला की- असे फारतर म्हणावे.
सांगलीत असतांना अणुविज्ञान या विषयावर मी तेरा व्याख्यानांची एक मालिका प्रस्तुत केली होती. त्याही वेळी त्यांत मला क्वचितच इंग्रजी शब्द वापरावे लागले. कित्येक विद्यार्थ्यानी सोपी व प्रभावी भाषा म्हणून तिचे स्वागत केले. त्यातील काही भाग अजूनही सांगली आकाशवाणीवर लावले जातात.

मात्र माझ्या निकालात भाषा सोपी असली तरी तिचा अर्थ स्पष्ट असेल व त्यांतून संभ्रम निर्माण होणार नाहीत ही काळजी मी घेतली. मराठी भाषेच्या वापराबाबत अजून एक मुद्दा नमूद करावासा वाटतो. कांही काळापूर्वी 'घातचक्र' नांवाची अरूण गद्रे यांची कादंबरी वाचली. मेडिकल कॉलेज मधे मार्कांचे रॅकेट, त्यातून उच्च व उच्चतम स्पेशलायझेशन साठी निर्माण होणा-या स्पर्धा, त्यांचे किळसवाणे रूप इत्यादीच्या पार्श्र्वभूमीवर ही कादंबरी आहे आणि विशेष म्हणजे लेखक स्वतः डॉक्टर आहेत त्यामुळे हे विश्र्व त्यांच्या जवळच्या परिचयाचे असणार. कादंबरीत एका मागासवर्गीय मुलाचे पात्र पण आहे. सर्व विषय नीट समजत असून, ऍनॉटमी व डिसेक्शन या विषयांमधे हातखंडा असूनही परीक्षेत उत्तम, उच्चभू, भारदस्त इंग्रजी भाषेत पेपर लिहिता येत नसल्यामुळे आणि प्रॅक्टिकल परीक्षेत तश्या इंग्रजीत उत्तरे देणे तर त्याहूनही अशक्य असल्याने तो परीक्षेत पास होऊ शकत नाही. कादंबरीच ती ! पण मला खात्री वाटते की आज अशी कित्येक मुले मेडिकल मधे असतील. त्यांना कांही डिग्री घेऊन लगेच फॉरेनला जायचे नाही की वर्ल्ड बँकेची नोकरी करायची नाही. त्यांनी मराठीत पेपर लिहायला व हवा तिथे इंग्रजी शब्द रोमन अगर देवनागरी लिपीत लिहायला कां हरकत असावी? त्यांना प्रत्यक्ष विषय किती आला हे जर जास्त महत्वाचे आहे तर त्यांना त्यांची परिचित भाषा वापरू घयला कांय हरकत आहे? पण ग्रेच्या ऍनॅटॉमी मधल्या प्रत्येक शब्दाला मर्यायी मराठी शब्द सांपडत नाही, अशी शब्दावली तयार होत नाही आणि ती शब्दावली परीक्षकांना पाठ होत नाही तोपर्यंत ऍनॅऑमीचा पेपर मराठीत लिहायला परवानगी नाही असे आपण म्हटले तर या मुलांच्या प्रश्नाची तड कशी लागणार? आणि माय मराठीची वाढ तरी कशी होणार?
----------------------------------------------------------------------------


Ashwinikumar Deore bringing Marathi in high court would certainly be a step towards educating people. Great hurdle is accurate substitute/suitable (easy to understand and also to write) vocabulary. Our generation of lawyers and Judges is neither perfect in Marathi nor in English. we have studied law subjects in English and now everybody expects us to write in Marathi. I do agree that unless somebody starts writing new substitute language will not develop but alike in English we are not prepared to accept few words in any other language and we are insisting that Marathi means Marathi. unless this attitude is completely changed there is no future to Marathi.
------------------

उच्च न्यायालयात मराठी
हा टप्पा हवा आहे पण आपले
राज्यशासन काहीही
करीत नाही. -- ( माहिती -- राज्यशासनाने नेमलेल्या न्या. धर्माधिकारी समितीने ही शिफारस (हायकोर्टांत
मराठी भाषा आणावी) केल्यानंतर हा मुद्दा शासनाच्या विधी-न्याय विभागाकडे
आला. कॅबिनेट नोट करायचे ठरले. पुढे माहीत नाही. सध्या नवे बिल मांडतांना
त्याचा मसूदा इंग्लिशमधे होतो कारण मराठीत मसूदा लिहिणे हे त्यांना जमत
नाही. पण तिथून सुरूवात केली तरी चालेल.)
------------------------------------------------------------------------------------------------------