Wednesday, September 19, 2012

सारणी आखून कामे करणे -- सुप्रशासनातील महत्वाचे अंग


काल मी व रवि खेबुडकरने (उप जिल्हाधिकारी सांगली) निश्चयाने एका नवीन कामाला सुरुवात केली त्यामागची भूमिका --

सरकारी कामांमधली चाळीस टक्के कामं सारणी तयार करणे व त्या आधाराने निष्कर्ष काढणे यामधे जातो. यासाठी सतत सारण्या आखून दिल्या जातात व कर्मचारी सतत माहिती भरत असतात. पण त्या आधाराने निष्कर्ष काढण्याकडे कुणी जात नाही कारण ते काम सोपे करायची गरज आहे. आणि संगणकामुळे हे सहज शक्य आहे. 
तसेच या सारण्या मॉड्यूलर असल्या म्हणजे छोट्या छोट्या व एकात एक बसवता येऊन बेरीज करता येईल अशा -- तर त्यातून सामान्य माणूसही खूप काही समजू शकतो. या संदर्भात माझा लेख नुकताच देशबंधु दैनिकाने छापला त्याची लिंक --  http://rajkeeya-chintan.blogspot.in/2012/08/1.html

अशा मॉड्यूलर सारण्या छोट्या असाव्यात आणि पूर्वीचे द्विमितीय रूप टाकून त्यांना त्रिमितीय रूप देणे गरजेचे आहे. पूर्वी समजा सांगलीतील सर्व तालुक्यातील पावसाबद्दलची माहिती हवी असेल तर सारणीतील पहिल्या स्तंभात अनुक्रमांक व लगेच दुस-यांत आपण तालुक्यांची नावं टाकत होतो. ही झाली द्विमितीय पद्धत.  त्यानंतर पावसाची माहिती वेगवेगळ्या
त-हेने घेण्याठी पुढे खूप स्तंभ आखून देत होतो व त्यांत माहिती भरणे जिकिरीचे होऊन जायचे. पण त्रिमितीय रूप समजून घेण्यासाठी आपण एका जाड वहीची कल्पना करू या. ती उघडली तर आपल्या लक्षांत येते कि हिला एक डावी बाजू आहे -- एक उजवी बाजू आहे, तसेच मधे जोडणारी एक जाड बाजू पण आहे. पुस्तक प्रकाशनांत हिला स्पाइन म्हणजे कणा असे नांव आहे व त्यावर पुस्तकाचे,  लेखकाचे व प्रकाशकाचे नांव टाकण्यासाठी त्या जागेचा वापर केला जातो. आपल्या त्रिमितीय सारणीमधे या स्पाइनचा चांगला वापर आपण करून घेणार आहोत.
सांगली जिल्हा सध्या दुष्काळांत आहे. येथील पाऊस व चाराछावण्याची माहिती कशी घेता येईल ते आपण पाहू ----
आपण असे 11 स्तंभ-शीर्षक  लिहू या --
  • गेल्या 5 वर्षातील सरासरी वार्षिक पाऊस 
  • गेल्या वर्षातील एकूण पाऊस 
  • गेल्या वर्षी 4  पावसाळी महिन्यांतील (जूनपासून) पाऊस
  • गेल्या वर्षी चालू महिन्यांतील पाऊस
  • या वर्षी 1 जून ते आतापर्यंत पाऊस
  • या महिन्यातील 1  ते आतापर्यंत पाऊस
  • सब-डिविजन (किंवा तालुका)
  • गेल्या 5 वर्षाचा चारा छावण्याचा खर्च
  • गेल्या वर्षाचा चारा छावण्यांचा खर्च
  • या वर्षी एप्रिल-जून मधील चाराखर्च
  • या वर्षी ऑक्टो  ते आतापर्यंत चाराखर्च

 यामधील सब-डिविजन (किंवा तालुका ) हा स्पाइनचा स्तंभ आहे. तिथे आपण सर्कल किंवा गांवापर्यंत जाऊ शकतो . किंवा जिल्हा, रेवेन्यू डिविजन, राज्य, झोन आणि देश इथपर्यंत जाऊ शकतो.
चांगल्या मॉड्यूलर सारणीमधे कण्याच्या डावीकडे पाच व उजवीकडे पाच यापेक्षा अधिक स्तंभ शक्यतो नसावेत. मात्र  एका स्तंभाची सविस्तर माहिती उपसारणी मधे देता येते. उदा. डावीकडील 6 स्तंभ-शीर्षके काढून तिथे 5 स्तंभ ठेवायचे. पैकी चारांमधे फक्त गेल्या वर्षी 4  पावसाळी महिन्यांतील (जूनपासून) पावसाची माहिती माहवार लिहिणे व पाचव्यामधे एकूण लिहिणे जेणेकरून त्या उपसारणीमधील माहिती मुख्य सारणीसाठी तत्काळ वापरता यावी. 
याच सारणीमधे उजवीकडे चाराछावणीऐवजी रोजगार-हमी कामांची माहिती किंवा पीक-पेरणीची माहिती दिल्यास त्यांची तुलना तत्काळपणे पावसाच्या लहरीपणाशी करता येते. डावीकडील स्तंभ हे कारण आहेत -- पाऊस हा कारण. त्याचा परिणाम टँकर खर्चावर, पीक-पेरणीवर, गुन्हेगारीत वाढ, शहराकडे पलायन अशा कित्येक गोष्टींवर होत असतो. मॉड्यूलर सारणी केल्याने या परिणामांची आपापसांत तुलना करता येते. 
तरच वरिष्ठ अधिका-यांना उचित निर्णय घेता येतात -- त्यांची कार्यक्षमता वाढते -- तरच जनतेला स्वतः परिस्थितीचे विश्लेषण करता येते आणि चांगल्या निर्णयाचे जागरूक स्वागत आणि चुकीच्या निर्णयातील नेमकी चूक दाखवणे या दोन्ही गोष्टी करता येतात.

No comments: