Saturday, November 19, 2016

राष्ट्रीय शिक्षणाचे अधिष्ठान

राष्ट्रीय शिक्षणाचे अधिष्ठान

Saptahik Vivek
तारीख: 10 Nov 2014 
आपण एका नव्या शिक्षणपध्दतीच्या जवळ येऊन ठेपलो आहोत व एका नव्या सूर्योदयाची वाट पाहत आहोत. हा सूर्य आहे अमेरिकन व युरोपियन युनिव्हर्सिटीचा! आपल्याकडील शिक्षणसंस्था झपाटयाने त्यांच्यासोबत MOU करीत आहेत. त्यांच्याकडून फ्रँचाइझी घेत आहेत. आपले शिक्षण वैश्विक होत आहे. ही नवी शिक्षण सुधारणा चांगले दिवस घेऊन येईल असे काही लोकांना वाटते. मला मात्र तसे वाटत नाही. कारण 

गेल्या दोनशे वर्षांत भारतीय शिक्षणपध्दतीचे रूप पालटत गेले. आपण समाजाधिष्ठित शिक्षणपध्दतीपासून राज्य शासनाधिष्ठित शिक्षणव्यवस्था व त्यातून पुढे व्यापाराधिष्ठित शिक्षणव्यवस्थेपर्यंत पोहोचलो आहोत.
ब्रिटिश शासनकाळात 1880मध्ये मेकॉलेने मांडलेली विस्तृत कारणमीमांसा व उद्दिष्टे समोर ठेवून राज्य शासनाधिष्ठित शिक्षणपध्दती राबवली गेली. त्यामध्ये 'युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशनही उदात्त कल्पना पुढे केलेली होती व देशभरांत हजारो शिक्षण संस्था - शाळामहाविद्यालयेविद्यापीठेवैद्यकीय महाविद्यालये इत्यादी उघडण्यात आली. त्यासाठी ब्रिटनच्या पार्लमेंटने मोठी रक्कमही मंजूर केली होती.
प्रत्यक्षात या संस्थांमधून ब्रिटिशांना नोकरवर्ग निर्माण करायचा होताजो इंग्रजी बोलून त्यांच्या पध्दतीची शासनव्यवस्था चालवण्यास मदत करू शकेल असा. ब्रिटिश शासनकर्तेआजारी पडल्यास युरोपीय पध्दतीने त्यावर उपचार करू शकणारे डॉक्टर्स हवे होते. दळणवळण वाढल्यास त्यांचा तयार माल देशाच्या कोनाकोपऱ्यात पोहोचणार होता. त्यासाठी त्यांच्या पध्दतीचे अभियंते हवे होते. वनसंपदा वापरता यावी यासाठी वनरक्षक व वनविषयक कायदे हवे होते. मुख्य म्हणजे वनजीवनाची भारतीय परंपरा संपवणे गरजेचे होते. त्यामुळे वनांतून चालणारी गुरुकुलेही संपणार होती. 
आधुनिक व समाजाधारित शिक्षणपध्दती
या नवीन शिक्षणामुळे एकीकडे भारतीयांना कळू शकले कीयुरोपातील शिक्षण परंपरा काय आहे आणि किती वेगाने पुढे जात आहे. आधुनिक विज्ञानाच्या दिशेने भारतीयांचीही प्रगती होऊलागली. त्यातून आपल्या देशाला जगदीशचंद्र बोससी.व्ही. रामन आणि होमी भाभा यांच्यासारखे शोध वैज्ञानिक मिळालेपण दुसरीकडे समाजाधारित शिक्षण परंपरा खंडित होऊ लागली आणि 1947 पर्यंत ती जवळजवळ संपुष्टात आलेली होती.
ही समाजाधिष्ठित परंपरा काय होतीतिचा थोडा आढावा घेणे उचित ठरेल. पूर्वी आपल्याकडे गुरुकुल परंपरा होती. म्हणजे विद्यार्थ्यांनी गुरुकुलात जाऊन राहायचे व गुरूसोबत राहून शिक्षण घ्यायचे. त्याच जोडीला गावोगावी पंतोजी किंवा शिक्षक-ब्राह्मण ही परंपरा होती. शिक्षक हा ब्राह्मण असायचाकारण अध्ययनस्वाध्याय व अध्यापन ही समाजाने ब्राह्मणाला नेमून दिलेली कामे होती. मात्र सर्वच  ब्राह्मण शिक्षक नसत. अशा अध्यापकासाठी जी कडक नियमावली होतीत्यामध्ये अपरिग्र्रह - म्हणजे पैसा न साठवणे हा गुण सर्वोपरी होता. तसे नसल्यास त्यांच्या ज्ञानाचा बाजार होतो. तसे असल्याने त्याच्या ज्ञानाचा बाजार होऊ शकत नव्हता. त्याने गावातील विद्यार्थ्यांना शिकवावे व बदल्यात समाजाने त्याच्या भरणपोषणाची जबाबदारी घ्यावी. नवीन गाव वसवताना जसे योग्य ते विविध कारागीर (बलुतेदार) आग्रहपूर्वक गावी आणून वसवले जाततसे पंतोजींनादेखील सन्मानाने बोलावून त्यांच्या उपजीविकेची व्यवस्था करून विद्यार्थिवर्गाला त्यांच्या सुपुर्द केले जात होते. यामुळे शिक्षण घेणाऱ्यांना अत्यल्प दरात किंवा पैसा खर्चावा न लागता शिक्षण मिळत होते. पंतोजींचे स्वतःचे चारित्र्य आणि त्यांची गावकऱ्यांशी जवळीक यामुळे ते विद्यार्थ्यांच्या आदरास पात्र ठरत. त्याने स्वेच्छेने व आनंदाने स्वतःच्या विद्येचा बाजार न होऊ देता ज्ञानप्रसार करणे महत्त्वाचे होते. अशी त्यागी वृत्ती असेलतोच शिक्षण देऊ शकत होता. त्यामुळे 'त्यागहा आवश्यक संस्कार म्हणून समाजापुढे ठेवला जात होता आणि विद्यार्थ्यांमध्येही त्याग हे मूल्य जोपासले जाऊ शकत होते. ही परंपरा जपण्यासाठी सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यागाचा संस्कार आयुष्यभर बाळगला नाहीपरंतु केवळ 10 टक्के विद्यार्थ्यांनी बाळगला तरी ते पुरेसे होते. हा विद्याप्रसार होत होता म्हणूनच ब्राह्मण वर्ग हा अकिंचन असला तरी पूजनीय होताआणि न्यायनिवाडयापासून तर अन्य कित्येक बाबींमध्ये त्याचा शब्द महत्त्वाचा असे. राजदंडापेक्षा ब्रह्मदंड श्रेष्ठ अशी परंपरा होती. त्याचेही कारण ही स्वेच्छेने स्वीकारलेली त्यागाचीअपरिग्रहाची आणि ज्ञानदानाची वृत्ती हेच होते.
गावोगावी असलेल्या या व्यवस्थेखेरीज विद्येची मोठमोठी केंद्रे व गुरुकुले होती, प्रसंगी ती रानावनांमधेही होती. तिथे गुरुगृही राहून शिक्षण घेतले जाई व ते घेताघेता संपूर्ण दिनचर्याव्यवस्थापनदीर्घकालीन व्यवस्थापन या गोष्टी शिकल्या जात. त्यामुळेच गुरुकुलातील शिक्षण हे जीवनावश्यक बाबी शिकवणारे शिक्षण असायचे व तिथेही संस्कारांना महत्त्वाचे स्थान होते. विद्यार्थ्याला अत्यल्प दरात शिक्षण आणि अपरिग्रह हे सूत्र तिथेही होतेच. तसेच ही गुरुकुले समाजाकडून मिळालेल्या दानावर चालत असत. त्यामुळे दान व त्याग या दोन मूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यांवर आपोआप कोरले जात. यामुळे ज्ञानप्रवाहाचा ओघ अव्याहतपणे राहायचा. तसेच गुरुकुलांचे व्यवस्थापन मोठे व दीर्घकालीन असल्यामुळे तिथे नवनवीन शोधांना वाव होता आणि या शोधकार्याचे फलित आजमावण्यासाठी शेजारील वनवासी व ग्रामवासी हे दोन घटक त्यांना मदत करीत,असा सिध्दान्त मी पूर्वी मांडलेला आहे. (मेहेंदळे, 2013.)
या शिक्षणव्यवस्थेला राजाश्रयाची फारशी गरज नव्हती. मात्र समाजमनात ही खोलवर रुजलेली असल्याने समाजाकडून ही व्यवस्था कायम राखली जात असे.
अशी समाजाधिष्ठित शिक्षणपध्दती मला तीन कारणांनी राज्याधिष्ठित पध्दतीपेक्षा श्रेष्ठ वाटते. पहिले कारण - विद्यार्थ्यांना अत्यल्प दरात शिक्षणज्यामुळे त्यागाचा व अपरिग्रहाचा संस्कार रुळत होता. दुसरे कारण - समाजाने पेललेली जबाबदारीज्यामुळे दोन राजांमध्ये लढाई झालीतरी शिक्षणव्यवस्थेला त्याची झळ लागू शकत नव्हती व निदान या बाबीसाठी तरी राजकारणापेक्षा समाजकारण हे जास्त टिकाऊ आणि श्रेष्ठ ठरत होते. तिसरे कारण - ग्रामीण जीवनात शोधकार्यांचा प्रभाव व फायदा तत्काळ मिळू शकत होता. अध्यापकाने समाधानी वृत्तीने अपरिग्रहाचा गुण जोपासण्यामध्ये या व्यवस्थेचे श्रेय होते आणि सुदैवाने भारतीय समाजरचनेत अशा लोकांची कमतरता कधीच भासली नाही.
मात्र या व्यवस्थेत तीन कमतरता असू शकतातहेही मान्य केले पाहिजे. विशेषतः ब्रिटिशांनी आणलेल्या राज्याधिष्ठित शिक्षणव्यवस्थेने त्यावर मात केली असल्याने त्यांची दखल घेणे गरजेचे आहे. एक- कालौघात या पद्धतीने शोधकार्य पूर्णपणे  थंडावले होते कां ? पंधराव्या ते विसाव्या शतकांत तरी तसे असावे हे म्हणण्यास वाव आहे व   ती या पद्धतीची दुखती रग ठरते. 
दुसरे - या शिक्षणपद्धतीत कधीतरी स्त्री आणि दलितांच्या शिक्षण विषयक गरजा भागवल्या जाण्याचे थंडावले एवढेच नाही तर त्यांना शिक्षण नकोच अशी  समाजविघातक वृत्ती उदयाला आली. त्यांची कुचंबणा होऊ लागली
तिसरे - अशा व्यवस्थेमधे मंदिरांचाही सहभाग होता तो ही कधीतरी संपुष्टांत आला.
भारतीय शिक्षणपध्दतीवर परिणाम
ब्रिटिशांनी राज्याधिष्ठित शिक्षणपध्दती आणल्यानंतर मेकॉलेने सुचवल्याप्रमाणे भारतीय शिक्षणपध्दतीचे पूर्णपणे खच्चीकरण करण्यात आले. आयुर्वेदाला आणि बलुतेदारीवर आधारित अर्थव्यवस्थेला त्याचा सर्वाधिक फटका बसला. त्यातच युरोपातील औद्योगिक क्रांतीत्यामुळे पक्क्या मालाचे सुबकटिकाऊ व तरीही स्वस्त उत्पादन आणि युरोपातील विज्ञान व शोधकार्यांचा विराट-अफाट विस्तार, यामुळे तीच शिक्षणपध्दती व त्यातील घालून दिलेले सिलॅबस श्रेष्ठ असल्याचे मान्य झाले. मग भलेही त्यामध्ये जीवनमूल्यांचे शिक्षण नव्हते व जीवन जगण्याचे तर नव्हतेच नव्हते.
या शिक्षणामुळे आणखी एक झाले - शेती, माती व निसर्ग यांच्या सान्निध्यातील जीवन  कमी दर्जाचे, हीन दर्जाचेतर नोकरी आणि शहरी जीवन हे उच्च दर्जाचे असेही समीकरण बनले. शिक्षण घेऊन लगेच सरकारी नोकरीत रुजू होणे हे सरळ आखीव रेघेइतके सोपे आणि हवेहवेसे होते. त्यागसमाधान किंवा अपरिग्रह यांच्या कल्पना अनावश्यक ठरत होत्या. शिक्षणासाठी समाजावर अवलंबून रहाणे संपले होते. शिक्षण हे शासनाने पुरवावे हा संकेत ठरत  होता. 
सन 1850 ते 1950 या काळात ही राज्याधिष्ठित व्यवस्था विस्तारली आणि भरभराटीला आली. त्याच्या खर्चाची जबाबदारी ब्रिटिश राजवटीवर होती. 1947 नंतर ही जबाबदारी या देशाच्या सरकारवर आली. पुढील पंचवीस-तीस वर्षांत लोकसंख्या वाढली - अपेक्षा वाढल्या. देशासाठी लढा, याची गरज उरली नव्हती तर देशाचा विचार ही गरजही मागे पडत होती. त्या ऐवजी उच्च शिक्षण घेऊन परदेशांत रहाण्याचे फायदेही दिसु लागलेले, पण त्यासाठी शिक्षण -व्यवस्थेत करावा लागणारा विस्तार सरकारच्या आवाक्याबाहेर होता. दुसरी कडे पूर्वीची समाजाधिष्ठित पद्धत बहुतांशी मोडीत निघाली होती. त्यामुळे अल्प दरात समाजाच्या संसाधनांच्या बळावर शिक्षण ही शक्यता लोप पावलेली होती. 
1980चे दशक उजाडले असताना शिक्षणव्यवस्थेबाबत एक नवा विचार पुढे येत होता. शिक्षणातून सरकारी नोकरी हा मार्ग जरी खुंटत चालला असलातरी शिक्षणानंतर ब्लू किंवा व्हाइट कॉलर जॉबच हवी हा विचार बळावत होता. गावात राहणे व शेतात काम करणे हे मागासलेपणाचे लक्षण होते. त्यापेक्षा एखाद्या कंपनीत किंवा सरकारात लिफ्टमनची अथवा चपराशाची नोकरी अधिक श्रेष्ठ होती. ज्यांना थोडयाफार उच्च शिक्षणाची ऐपत होतीत्यांना अमेरिका नामक स्वर्गभूमी खुणावत होती. मग व्यापाराधिष्ठित शिक्षणाचे तत्त्वज्ञान समोर आले. 
पालकांनी मुलांच्या शिक्षणासाठी इतके 'लाख'रुपये 'इन्व्हेस्टकरावेत्याबदल्यात त्यांची मुले इतके 'कोटीकमावण्यास सक्षम करून देतो असे सांगत हजारो शिक्षण संस्था उदयाला आल्या. हा व्यापार आहे म्हटल्यावर त्यामध्ये 'लाभहे मूल्य सर्वश्रेष्ठ ठरले आणि त्यागअपरिग्रह,समाधान ही मूल्ये हानिकारक व महत्त्वकांक्षा संपवणारी असे म्हणत त्यांची हेटाळणी होऊ लागली.
 सुरुवातीला हे व्यापारीकरण उच्च शिक्षणापुरते मर्यादित राहील व फक्त अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणापुरतेच त्यांचे व्यापारी लाभ टिकून राहतीलअसे वाटले होते. मात्र सरकारी विनाअनुदानित शाळांचे पेव फुटू लागले होतेतर खुद्द सरकारी शाळा हलाखीत चालल्या होत्या. विशेषतः शहरांमध्ये तर त्या हलाखीत असण्यानेच व्यापारी शाळांना वाव मिळणार होता. तसेच होऊ लागले. शिवाय इंग्रजी म्हणजेच श्रीमंती हे समीकरण दृढ होत गेले.त्यामुळे अधिकाधिक  वेगाने शिक्षणाचे स्वरूप पालटत गेले.
 दुसरीकडे शासकीय शोधसंस्थानांमधील शोधविषयक बाजू झपाटयाने कमकुवत होत लयाला पोहोचली होती. देशांतर्गत शोधकार्य हा थट्टेचा विषय बनला होता. त्यामुळेही जे कोणी जीनियस असतीलत्यांना अमेरिका शरणाशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे मातृभाषा शिक्षण म्हणजे'थर्ड रेटअसेही समीकरण दृढ होत चालले होते.
व्यापाराधिष्ठित शिक्षणव्यवस्था
पुढील तीस वर्षांत व्यापाराधिष्ठित शिक्षण ही व्यवस्था भरभक्कम होऊन सरकारी शिक्षणव्यवस्थादेखील जवळपास मोडीत निघाली आहे. अपवाद आहे तो फक्त दूर डोंगरदऱ्यांतील सरकारी शाळांचा आणि इस्रो व BARC या दोन शोधसंस्थांचा. देशही झपाटयाने श्रीमंत होत आहेकारण शिक्षणातील व्यापारी उलाढाल जेवढी मोठीतेवढा देशाचा जीडीपी वाढतो. पाटी-पेन्सिलसारखे स्वस्त व पर्यावरण-पोषक पर्याय सोडून जेव्हा वह्या-पेनांचा वापर वाढतोतेव्हाही व्यापार वाढल्यामुळे जीडीपी वाढत असतो. शाळांबरोबर कोचिंग क्लासेस वाढले की जीडीपी आणखी वाढतो. पाल्यांनी जवळच्या शाळेत जाण्याऐवजी लांबच्या शाळेत गेलेत्यासाठी वेगळी वाहतूक व्यवस्था करावी लागली की त्यामुळेही जीडीपी वाढतो. अशा जीडीपी आधारित श्रीमंतीच्या मोजमाप पद्धतीने आपण कितीतरी अनुत्पादक बाबींवर आपली शक्ति खर्च करीत असतो हे दुर्लक्षित रहाते.

शिवाय या व्यापाराधिष्ठित शिक्षणव्यवस्थेचा मोठा फायदा हा कीजे कोणी सत्तेत येऊ शकतील त्यांना लगेच हा जोडधंदा सुरू करता येऊ शकतो.
मला मारियो पुझोच्या गॉडफादर-या कादंबरीतील एक संवाद आठवतो. गॉडफादर-1च्या शेवटी पहिल्या डॉनची सद्दी संपून त्याचे सर्व अंडरवर्ल्ड मुलाच्या ताब्यात आलेले असते. गॉडफादर-2च्या सुरुवातीलाच हा संवाद आहे. त्यात पहिला डॉन मुलाला (नव्या डॉनला) सल्ला देतो - मी ज्या काळात डॉनगिरी केलीतो काळ त्या पध्दतीच्या डॉनगिरिला अनुकूल होता. आता काळ पालटत चालला आहे. पुढील काळात तुला तुझे डॉनपद टिकवायचे असेलतर त्याचा एकच मार्ग आहे - जमतील तेवढी शिक्षण संस्थाने आपल्या ताब्यांत घे. 
2011 च्या दशकात पुन: एकवार विचार होऊ लागला आहे. देशातील बेरोजगारीवाढती गुन्हेगारीमहागाई इत्यादी कित्येक समस्यांचे उत्तर शिक्षणपध्दतीच्या सुधारणेमुळे मिळेल,असे लोकांना वाटते. मलाही तसेच वाटते. पण सुधारणा कशी असावीहा महत्त्वाचा विषय आहे.
जुन्या कवींनी म्हटले होते - जब आवे संतोष धनसब धन धुलि समान! नवीन जमाना सांगतो - जब आवे धन तो बाकी सब जीवनमूल्य धूलि समान! व्यापाराधिष्ठित शिक्षणपध्दतीत 'धनहेच सर्वश्रेष्ठ जीवनमूल्य राहिले.
आता आपण एका नव्या शिक्षणपध्दतीच्या जवळ येऊन ठेपलो आहोत व या नव्या सूर्योदयाची वाट पाहत आहोत. हा सूर्य आहे अमेरिकन व युरोपियन युनिव्हर्सिटीचा! आपल्याकडील शिक्षणसंस्था झपाटयाने त्यांच्यासोबत सामंजस्य करार करीत आहेत. त्यांच्याकडून फ्रँचाइझी घेत आहेत. आपले शिक्षण वैश्विक होत आहे. आपण कोणकोणत्या युनिवर्सिटीजसोबत त्यांची व्यवस्था स्वीकारण्याचा करार केला त्याची जाहिरात करण्याची अहमअहमिका लागलेली आहे. ही नवी शिक्षण सुधारणा चांगले दिवस घेऊन येईल असे कित्येकांना वाटते. मला मात्र तसे वाटत नाही. 
कारण शिक्षणातून जोपर्यंत त्याग आणि अपरिग्रह ही दोन भारतीय मूल्ये रुजत नाहीततोपर्यंत ते शिक्षण सामाजिक विषमता आणि तेढ हेच वाढवत राहणारअसे मला वाटते.
leena.mehendale@gmail.com

No comments: