***लीना मेहेंदळे***
कम्युनिझमची ज्यांना भुरळ पडली, त्यांना 'धर्म ही अफूची गोळी आहे, हे वाक्य खुणावत होते.
त्यातच ब्रिटिशांनी रुजवलेल्या मेकॉले-धोरणाची भर पडली. जे जे भारतीय ते ते अवैज्ञानिक
आणि जे जे पाश्चात्त्य ते ते वैज्ञानिक, आधुनिक आणि प्रगतीकडे नेणारे असाही एक रोमँटिसिझम
पसरला. लोकांना वैज्ञानिक हे बिरुद आवडू लागले. त्यासाठी भारतीय व धार्मिक ही बिरुदे
पूर्णपणे अप्रशस्त आणि विरोधी होती. त्यातून भारतीय संस्कृतीचा अभ्यास न करणे, भारतीय
तत्त्वज्ञान न समजणे, भारताचा मागील दोन हजार ते दहा हजार वर्षांपूर्वीचा इतिहास न वाचता
ब्रिटिशांनी त्याविषयी रुजवलेले समज दृढ करणे अशी मानसिकता तयार झाली.
कॉलेजवयापासून माझी दोन आवडती फिल्मी गाणी आहेत - 'वो सुबह कभी तो आयेगी'
आणि 'यही पैगाम हमारा'. मलाच काय, माझ्या पिढीतील आणि माझ्यापेक्षा 30-40 वर्षे
लहान असलेल्या पिढीतही कित्येकांना ही गाणी आवडत असतील याची मला खात्री आहे.
मला ही गाणी आवडत असत, याचे कारण माझ्यावर झालेले संस्कार असे मी मानते.
हे संस्कार होते सचोटी, इमान, न्याय, श्रध्दा, त्याग, विश्वबंधुता, देशप्रेम वगैरे.
त्यामध्ये सचोटी ही सर्वप्रथम होती. पापाचा पैसा नको ही पराकोटीची शिकवण होती.
त्याचबरोबर निर्व्यसनीपणाही पराकाष्ठेचा होता. वडील चहा आणि सुपारीलाही
शिवत नसत. साधेपणाचा आणि हुशारीचा संस्कारही होता. भगवद्गीता हा माझा
गुरुग्रंथ आणि श्रीकृष्ण म्हणजे जगद्गुरू. कधीही शंका असेल तर निराकरण इथूनच
होणार. महाभारतातील मुद्गल ॠषी, राजा रन्तिदेवाची कथा, भीष्मांचा त्याग
, कर्णाचा त्याग, राम आणि युधिष्ठिर यांचे बंधुप्रेम वगैरे वगैरे आदर्श होतेच.
शांतीचा आणि सत्याग्रहाचा आग्रह धरणारे गांधीजी जितके आदर्श वाटत,
तितकेच देशासाठी सशस्त्र संघर्ष आणि जिवाची आहुती देणारे चाणक्य, राणा
प्रताप, बिस्मिल, भगतसिंग, सुभाषबाबू आणि सावरकरही आदर्श वाटत. वैज्ञानिक
दृष्टीकोन बाळगणारे नेहरू हे आदर्श वाटत, तसेच भक्ती आणि श्रध्देचा मार्ग
दाखवणारे प्रल्हाद, ध्रुव, नारद, कबीर, सूरदास, मीरा, तुलसीदास, रसखान हेही
आदर्श होते. एखाद्या राजाने यज्ञ केल्यास यज्ञाच्या अंती त्याने आपले सर्वस्व
दान करून टाकायचे असते. हा दानाचा आदर्श एकीकडे, तर ब्राह्मणाने अहिंसा,
सत्य, अस्तेय म्हणजे चोरी न करणे, ब्रह्मचर्य म्हणजे कठोर साधना आणि
अपरिग्रह म्हणजे धनसंचय न करणे हे गुण मला आदर्शवत होते. सर्वात
महत्त्वाचे म्हणजे शिक्षणाबद्दल असलेले भारतीय तत्त्वज्ञान - गुरूने विद्या
विकू नये आणि आर्थिक कारणाने कोणाचे शिक्षण अडू नये.
म्हणूनच त्या दोन गाण्यांमधल्या ओळी - 'हर एक महलसे कहो कि झोपडीयोंमें
दिए जलाये', 'सब के लिए सुखका हो बराबर बटवारा', 'इन्सान का इन्सान से हो
भाईचारा', 'इन काली सदियो सें जब रात का साया सरकेगा', 'वो सुबह कभी
तो आएगी' यासारख्या ओळी हृदयाला भिडलेल्या होत्या. त्या आपल्या भारतीय
मूल्यांना धरूनच आहेत ही पुरेपूर खात्री होती.
कॉलेजमध्ये मी गणित, विज्ञान आणि वडिलांकडून लॉजिक, तत्त्वज्ञान आणि
संस्कृत शिकले. पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमी, इंटरनॅशनल रिलेशन्स यांसारख्या
विषयांशी माझा संबंध नव्हता. पण भारतीय प्रशासन सेवेच्या परीक्षेसाठी
युरोपियन हिस्ट्री हा विषय निवडला होता, त्याच्या अभ्यासाच्या वेळी फे्रंच
रिव्होल्यूशन, डेमॉक्रसी, रूसो, बिस्मार्क, माक्र्स, लेनिन, हिटलर, फ्री इकॉनॉमी,
कम्युनिझम, सोशॅलिझम या शब्दांची आणि माझी गाठ पडली. पुढे प्रशासनात
आल्यावर हेच शब्द पुढे आणि गणित, भौतिकी, तत्त्वज्ञान मागे पडू
लागणार असे वाटले - पण ती सांगड मी कशी घातली, हा वेगळा विषय आहे.
आता माझ्या आवडत्या ओळींबाबत एक वेगळी गोष्ट जाणवू लागली. ही गीते
ज्यांनी लिहिली, ज्यांनी वापरली आणि ज्यांना भावली, ती बहुतेक मंडळी कम्युनिस्ट
विचारसरणीतील रोमँटिसिझमने भारलेली होती. एकीकडे कम्युनिस्ट स्टॅलिनची
आणि चिनी हुकूमशाही, चीनने भारतावर केलेले आक्रमण, नक्षलवाद, यामुळे
माझ्या मनात कम्युनिझम म्हणजे आक्रमक हुकूमशाही असे समीकरण झाले,
तर दुसरीकडे भारतीय डेमॉक्रसी आणि त्यातील चाखलेली चांगली फळे यांची तुलना
होती. फ्री इकॉनॉमीचे व डेमॉक्रसीचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या अमेरिकेची
भरभराट दिसत असल्याने कम्युनिस्ट तत्त्वज्ञानात काही तरी चुकते आहे,
असे वाटत असतानाच तीच अमेरिका डेमॉक्रेटिक भारताविरुध्द पाकिस्तानची
बाजू उचलून धरते, हा विरोधाभासही होता.
धर्म हा अफूची गोळी आहे - Religion is opium हे कार्ल माक्र्सचे आवडते
आणि बहुउद्घोषित वाक्य - ते मला मुळीच पटत नव्हते - मात्र सर्वे भवन्तु
सुखिन: सर्वे सन्तु निरामय:। सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुख:भाग्
भवेत्। हे तत्त्वज्ञान तर बरोबर आणि तेच आदर्श सांगणारी गाणी लिहिणारे
मात्र कम्युनिझमच्या विचारसरणीतील, हे कसे? हुकूमशाहीकडे वळणारा
कम्युनिझम त्यांना का पटला असेल?
हे कळण्यासाठी युरोपीय इतिहासाचा अभ्यास माझ्या उपयोगी आला. विचार
करता लक्षात आले की माझी आवडती गीते ज्यांनी लिहिली, त्यांनी कम्युनिझमचे
तत्त्व वाचलेले होते, पण भारतीय तत्त्वज्ञान मात्र वाचलेले नव्हते. आर्थिक विषमता
संपवण्यासाठी वर्ग संघर्ष झालाच पहिजे, Labors of the World, Unite आणि
संख्याबळावर तसेच सशस्त्र संघर्षातून प्रोलिटेरियट वर्गाने श्रीमंत कारखानदारांची
मक्तेदारी मोडून आपले वर्चस्व स्थापन करावे हे माक्र्सचे तत्त्वज्ञान त्यांनी
वाचलेले आणि त्यांना भावलेले, पण गांधींचे वाक्य - There is a Enough for
Everyone's need, but not for anyone's greed - याचा उद्घोष त्यांच्या
लेखनातून किंवा विचारातून दिसला नाही. पुरुषार्थ आणि कर्तृत्व यासोबतच
तेवढेच वैराग्य बाळगणारा राजा जनक हा कृष्णाच्या दृष्टीनेही अनुकरणीय
ठरवला जातो, हे भारतीय संस्कृतीचे मर्म त्यांना माहीत नाही. 'जब आवे
संतोष धन, सब धन धुलि समान' हे त्यांनी अनुभवलेले नाही.
याची दुसरी बाजूही बघायला हवी. स्वातंत्र्यलढयातील माझे लाडके हिरो
म्हणजे चंद्रशेखर आझाद, भगतसिंग. हे कम्युनिस्ट विचारसरणीचे अभ्यासक
आणि प्रशंसक नक्कीच होते. कारण त्यांनाही भारतीय समाजातील विषमता,
दारिद्रय, दैन्य आणि शिवाय जातीची उतरंड दिसत होती आणि ते संपावे असे
वाटत होते. तेच विवेकानंदांनाही वाटत होते. पण त्यांनी राजकीय मार्गाऐवजी
सामाजिक मार्ग स्वीकारून, रामकृष्ण मठांची स्थापना करून, साखळी उभी
करून ते माध्यम वापरले. ब्रिटिशांविरोधात भारतीय स्वातंत्र्य घेणे हे आझादांचे
ध्येय होते. त्यांनी जो पक्ष उभारला, त्याचे नावही हिंदुस्थान सोशालिस्ट
रिपब्लिकन पार्टी असे होते, पण उद्दिष्ट मात्र ब्रिटिशांना हाकलण्याचे होते.
समाजवादी विचारसरणीची भुरळ नेहरूंनाही पडली व मान्य होती. त्यांनी
पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आणि सेंट्रलाईझ्ड प्लानिंग अशी दोन रशियन
धोरणे भारतात आणली आणि राबविली.
म्हणूनच आधी कम्युनिझमची पार्श्वभूमी आणि उदय समजून घेतले पाहिजेत.
युरोपीय संस्कृतीत व त्याआधीही ग्रीक व अरब संस्कृतीमध्ये गुलामगिरीची
पध्दत होती. 1500 नंतर युरोपमध्ये व्हायकिंग आणि समुद्री चाचेगिरीचे तंत्र
उदयाला आले. त्यापैकी जे अफ्रिकेत गेले, त्यांनी तेथील लोकांची सामूहिक कत्तल
केली किंवा त्यांना गुलाम तरी करून घेतले. त्या काळी युरोपीय वस्त्र-उद्योग लोकर
आधारित होता. अमेरिकेत कापूस होता व तो वस्त्रोद्योग गुलामांवर आधारित होता.
दोन्ही ठिकाणी गुलामांवर आणि मजुरांवर अत्याचार, मारझोड, चाबकाने झोड़ून
काढणे, अंगविच्छेद करणे, इत्यादी सर्रास होते. 1770 च्या सुमारास युरोपातही इंडस्ट्रियल
रिव्होल्यूशनमुळे ग्रामोद्योग संपून फॅक्टरी आणि मिल्समधून उत्पादन सुरू झाले.
त्यामध्ये त्या त्या उद्योगाची भरभराट, Mass Production, सुबकता आणि मोठा
नफा हे होत असले, तरी तिथल्या मजुरांचे मात्र हालच होते. ते गुलाम नसले तरी मारझोड,
हलाखी, दारिद्रय हेच त्यांच्या वाटयाला होते. केंद्रित उत्पादनासाठी भरपूर मजुरांची
गरज निर्माण होऊन त्यापोटी शहरीकरणाचा वेग झपाटयाने वाढला. त्यातही
मजुरांची हलाखी वाढत गेली. या सर्वांविरोधात 1856 मध्ये मार्क्सने जो उपाय
(कम्युनिस्ट मेनिफेस्टो) मांडला, त्यामध्ये सर्वांना चांगले दिवस येवोत या
स्वप्नपूर्तीसाठी संख्याबळाचा वापर व गरज पडल्यास सशस्त्र संघर्ष हे तत्त्व होते.
त्याआधी युरोपात आर्थिक विषमता जावो या मताचे जे तत्त्वज्ञ होते, त्यांनी उदात्त
मूल्यांच्या आधाराने समाजवाद असे चिंतन मांडले होते. त्यांना युटोपियन
सोशॅलिझम असे झिडकारत मार्क्स आणि हेगेलने साइंटिफिक सोशॅलिझम
असा नवा शब्द रचून त्यामधे क्लास स्ट्रगलच्या आधाराने सत्ता, आणि त्या
आधाराने आर्थिक विषमता संपवणे हे सूत्र मांडले. सत्ता असल्याखेरीज काहीही
चांगले बदल करता येत नाहीत असाही एक आतील प्रवाह त्यात होता.
1914 मध्ये पहिले जागतिक महायुध्द सुरू झाले. तोपर्यंत फ्रान्स, जर्मनी आणि
इटलीमधील राजेशाहीजवळ जवळ संपलेली होती. तिथे लोकतांत्रिक मूल्ये
रुजत होती. रशियात 1905 मध्ये शेतकऱ्यांची क्रांती होऊनही झारशाही संपली
नव्हती. या पार्श्वभूमीवर जेव्हा 1917 मध्ये रशियन फौजा युध्दात पराभूत होऊ
लागल्या, तेव्हा तिथे झारशाही उलथून टाकली गेली आणि लेनिनच्या
नेतृत्वाखाली कम्युनिस्ट राजवट तिथे आली. मात्र 1828 मध्ये सत्तेवर
आलेल्या स्टालिनने दाखवून दिले की कम्युनिस्ट हुकूमशाही कशी कठोर असू
शकते आणि म्हणूनच घातकही ठरते.
मार्क्सचे कम्युनिस्ट तत्त्वज्ञान, त्यामागची युरोपियन देशातील पार्श्वभूमी
आणि भारतीय दारिद्रयाची पार्श्वभूमी वेगवेगळया आहेत. सुमारे हजार-बाराशे
वर्षांपूर्वी मुसलमान आक्रमक भारतात आले. ते येत, लुटालूट करत आणि परत
जात. मग त्यांनी इथे राज्य करायला सुरुवात केली. धर्मांतरणही केले. तरीही
त्यांनी भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था बदलली नाही. बलुतेदारीवर आधारित
ही अर्थव्यवस्था होती, ज्यामध्ये एखादे खेडे किंवा पंचक्रोशी मिळून सर्व तऱ्हेच्या
उद्योगधंद्यांमध्ये स्वयंपूर्ण आणि कौशल्यपूर्ण असायचे. कित्येक बलुतांनी
धर्मांतरण होऊनही आपला व्यवसाय सोडला नाही. विशेषतः वस्त्रोद्योग
अतिशय पुढारलेला होता. भारतात कधीही गुलामगिरी म्हणजे Slavery नव्हती.
काही बलुतं गावात स्थिरावलेली होती, तर कित्येक बलुतं फिरस्ती होती. शेतकरी
समृध्द होताच, तसेच कौशल्यशाली बलुतंदेखील सुखी होते. गावोगावी कौशल्य
शिक्षणाची सोय होती. तसेच लेखन, वाचन, गणित हेही शिकवले जाई. म्हणूनच
सुमारे 1600 पर्यंत भारत हा सोने की चिडिया या नावाने ओळखला जाई. उत्तर
पश्चिमेकडील व्यापार खुश्कीच्या मार्गाने, तर दक्षिण पूर्व आणि दक्षिण पश्चिम
व्यापार समुद्री गलबतांच्या मार्गाने होत असे. ही गलबते लांबलांबच्या देशांत पोहोचून
व्यापार करीत.
सन 1500 नंतर पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि ब्रिटिश हे सर्व चाचेगिरी करत भारतात येऊ
लागले. इथले काही प्रदेश त्यांनी जिंकले. पण त्याहून मुख्य म्हणजे त्यांनी आधी
लुटालुटीच्या मार्गाने व नंतर बंदरांवर कब्जा मिळवून भारतीय गलबतांचा व्यापार
रोखला. प्लासीची लढाई जिंकून कलकत्त्यात पाय रोवल्यावर ब्रिटिशांनी
सर्वप्रथम संपूर्ण वस्त्रव्यापार ब्रिटिश गुमास्त्यांच्या मार्फतच व त्यावर मोठे कर या
प्रकाराने इथला वस्त्रोद्योग ताब्यात घेतला. त्यासाठी सुरू केलेली विणकरांची
कत्तल, त्यांची बोटे तोडणे, चाबकाचे फटके हे सर्व भारतीयांना नवीन होते. त्यांनी
भारतात सक्तीने मोठया प्रमाणांत अफूची शेती सुरू केली. जसजसे नवे प्रांत
जिंकत गेले, तसतसे त्यांनी सर्वदूर ग्रामीण अर्थव्यवस्था मोडीत काढली. यावरून
लक्षात येते की युरोपातील आर्थिक विषमतेला आणि दारिद्रयाला तिथली
आर्थिक आणि औद्योगिक परिस्थिती कारणीभूत होती, तर भारतीय दारिद्रय
आणि जातीय विषमता ही ब्रिटिशांच्या राजकीय धोरणांचा परिपाक होती.
त्यातच वस्त्रोद्योग, साखर उद्योग इत्यादीमधे केंद्रित उत्पादन पध्दत आल्यामुळे
भारतातही शहरात गांजलेला मजूर आणि गावाकडे गांजलेला शेतकरी असे चित्र दिसू लागले.
1900 ते 1950 या काळातील सर्वच भारतीय चिंतनशील लोकांना युरोपियन
दारिद्रय आणि मजूर-विरोधी धोरणाला उपाय सांगणारे कम्युनिस्ट तत्त्वज्ञान
आवडले नसते, तरच नवल होते. या नवीन कम्युनिस्ट तत्त्वज्ञानात आर्थिक
विषमतेविरुध्द सशस्त्र व हिंसक लढयाचे समर्थन होते, तसेच सत्ता हाती
आल्यावर हिंसक मार्गाने इतर मतप्रवाहांना रोखणे याचेही समर्थन होते.
म्हणूनच रशियात स्टालिन आणि चीनमध्ये माओ-त्से-तुंग यांच्यासारखे
हुकूमशहा आले आणि टिकले. याउलट दोन महायुध्दांची पार्श्वभूमी असलेल्या
पश्चिमी युरोपीय देशांना त्यातील हिंसा अयोग्य वाटली, त्यांनी पुन्हा लोकतांत्रिक
मार्गाने समाजवादातील आर्थिक समतेचे उद्दिष्ट (थोडक्यांत युटोपियन समाजवाद)
हा पर्याय निवडला. आज त्या (पश्चिम युरोपियन) देशांमध्येही मोठया प्रमाणावर
सोशॅलिझमचे मूळ तत्त्वज्ञान - म्हणजे सर्वांना रोटी, कपडा, मकान असणे
इत्यादी मान्य आहे आणि ते देश आज प्रगत आहेत. तिथे विद्यार्थ्यांना आर्थिक
चणचण न जाणवू देता शिक्षण, सोशल सिक्युरिटीची उत्तम सोय, प्रशासनातील
सोपेपणा, समाजाच्या समृध्दीसाठी आवश्यक मूल्यांची जपणूक वगैरे आहेत, आणि
प्रगत असे प्रायव्हेट सेक्टरही आहे. रशियात मात्र कम्युनिस्ट पार्टीच सर्व उद्योगधंद्यांची
मालक - आणि शासनातही तिचीच सत्ता हे मॉडेल बनले. भारतातील कम्युनिस्टांनी
त्याचा ध्यास घेतला. मात्र पंचाहत्तर वर्षातच ते मॉडेल फसले आणि शेवटी 1991 मध्ये
त्याचा उद्रेक होऊन युनियन ऑॅफ सोविएट सोशालिस्ट रिपब्लिकचे तुकडे तुकडे झाले.
कम्युनिस्ट पार्टीचा झेंडा जाऊन पुन्हा एकदा क्रेमलिनमध्ये झारशाहीतील
रशियाचा झेंडा फडकला.
मी यातील बराच इतिहास भा.प्र.से.च्या परीक्षाकाळात वाचून काढला होता.
सहाजिकच भारतीय स्वातंत्र्यलढयातील नेते कम्युनिस्ट विचारसरणीने
भारले गेले, तर त्यात नवल नव्हते. भारतातील पारतंत्र्यामुळे सर्वप्रथम स्वातंत्र्य
हवे, मग इतर गोष्टी अशी कित्येकांची विचारसरणी होती आणि म्हणूनच सशस्त्र
हिंसक संघर्षाला सावरकर, टिळक, आझाद, भगतसिंग आणि सुभाषचंद्र या कुणाचाच
अधिक्षेप नव्हता. पण ते समर्थन परकीयांच्या विरोधात होते, हे लक्षात ठेवले
पाहिजे. म्हणूनच स्वातंत्र्यानंतर हिंसक संघर्षाची भूमिका संपली. दारिद्रय मात्र
कायम राहिले आणि त्याविरुध्द लढा द्यावाच लागणार होता. त्यासाठी
कम्युनिझम आणि सोशॅलिझम या शब्दांना आयकॉनिक आणि रोमँटिक
मूल्य प्राप्त झाले होते. भारतातील समस्येमध्ये दारिद्रय आणि आर्थिक विषमता
यासोबत जातीय विषमताही होती. ती संपवण्यासाठी संघर्ष हवा असे सांगणाऱ्या
आंबेडकरांनी मात्र अहिंसक संघर्षाचाच पाठपुरावा केला. हिंसक संघर्षाला
त्यांनी मान्यता दिली नाही. पुढे संधी मिळाल्यावर घटनात्मक आरक्षणाचा
पाठपुरावा करून ही जातीय विषमता संपवावी या मताचा त्यांनी पुरस्कार केला.
कम्युनिझमची ज्यांना भुरळ पडली, त्यांना ही 'धर्म हा अफूची गोळी आहे' हे
वाक्य खुणावत होते. त्यातच ब्रिटिशांनी रुजवलेल्या मेकॉले-धोरणाची भर पडली.
जे जे भारतीय ते ते अवैज्ञानिक आणि जे जे पाश्चात्त्य ते ते वैज्ञानिक, आधुनिक
आणि प्रगतीकडे नेणारे असाही एक रोमँटिसिझम पसरला. लोकांना वैज्ञानिक
हे बिरुद आवडू लागले. त्यासाठी भारतीय व धार्मिक ही बिरुदे पूर्णपणे अप्रशस्त
आणि विरोधी होती. त्यातून भारतीय संस्कृतीचा अभ्यास न करणे, भारतीय
तत्त्वज्ञान न समजणे, भारताचा मागील दोन हजार ते दहा हजार वर्षांपूर्वीचा
इतिहास न वाचता ब्रिटिशांनी त्याविषयी रुजवलेले समज दृढ करणे अशी
मानसिकता तयार झाली.
आज रोजी कम्युनिझम कुठे आहे? रशियात नाही. चीनमध्ये नाही. खुद्द
भारतात ज्या बंगालमध्ये प्रमुख कम्युनिस्ट नेते व राजवट होती, तेथील
ज्योती बसूंनी खाजगी क्षेत्राला जवळ केले. तरीही भारतात कम्युनिस्ट
पक्ष आहे आणि त्यांना अजूनही भारतीय संस्कृती समजलेली नाही. ते अजूनही
धर्म ही अफूची गोळी आहे या वाक्याला घट्ट धरून भारतीयांच्या धार्मिकतेची
टिंगल करतात. पण युरोपीय देशांतील कुणीही कम्युनिस्ट ख्रिश्चन धर्मावर
किंवा ख्रिश्चन धर्मीयांवर टीका करत नाही, हे ते विसरतात. ते स्वतःदेखील
कधी ख्रिश्चन धर्माची टिंगल करू धजत नाहीत. भारतीय कम्युनिस्टांचा
रोमँटिसिझम असे मी म्हणते, त्याचे कारण असे की हे नवे तत्त्वज्ञान
जवळ करताना आपले तत्त्वज्ञान काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न न करताच
त्यांनी जे जे भारतीय ते ते टिंगलणीय अशी भूमिका घेतली.
पण प्रश्न हा उरतो की इतर राजकीय पक्षीयांना तरी आपले तत्त्वज्ञान काय
हे समजले आहे का? सुलभ शिक्षण, कौशल्य शिक्षण, पर्यावरणवादी चिरंतन
विकास, निसर्गाशी सुसंगत समृध्दी, सचोटी, परिश्रम, शोधक आणि
चिंतनशील पुरुषार्थ, संतोष, समता आणि त्यागावर आधारित सामाजिक
आणि आर्थिक समृध्दी तसेच गरीबांनाही रोटी, कपडा, मकान, आआरोग्य
आणि शिक्षण हे राजकीय तत्त्वज्ञान आणि त्यासाठी आवश्यक असलेली
पुस्तकी शिक्षणाऐवजी कौशल्य शिक्षणावर भर देणारी सर्वस्तरीय आणि सुलभ
शिक्षण पध्दती हा कुणाचा अजेंडा आहे का?
कम्युनिझमच्या तत्त्वज्ञानाला अतिशय समर्पक तात्त्विक उत्तर आपल्याला
काही अंशी आयन रँड या लेखिकेच्या 'ऍटलास श्रग्ड' या बेस्टसेलर कादंबरीत
वाचायला मिळते. यामध्ये फ्री इकॉनॉमीचे इतके टोकाचे समर्थन आहे की
तेही एकांगी वाटू लागते. मी माझ्या परीने त्यावर विचार केला, तेव्हा
असे लक्षात आले की फ्री इकॉनॉमीचे तत्त्वज्ञानदेखील गेल्या चार-पाचशे
वर्षांतलेच आहे आणि त्यामध्ये पर्यावरण किंवा निसर्ग याचा विचार नाही.
नैसर्र्गिक संपत्तीचे अनिर्बंध दोहन आणि तिच्या पुनर्भरणाचा विचार न
करणे हे फ्री इकॉनॉमीचे प्रमुख सूत्र आहे. पर्यावरणपोषकता, संतोष, त्याग
हे भारतीय दर्शनातले गुण त्यात कुठेच दृष्टिपथात नाहीत, त्यामुळे दोनशे
वर्षांपूर्वीचा माक्र्सवाद, चारशे वर्षांपूर्वीचे फ्री इकॉनॉमीचे तत्त्वज्ञान आणि
हजारो वर्षांपूर्वीची भारतीय मूल्ये यापैकी आपण काय निवडणार, हे आपण
प्रत्येकाने ठरवायचे आहे.
leena.mehendale@gmail.com
No comments:
Post a Comment