शाळेतील मराठीसाठी बालसाहित्याला प्रोत्साहन हवे
- लीना मेहेंदळे.
-- leenameh@yahoo.com
शालेय शिक्षणांत मराठीची गळचेपी होत असल्याची खंत वारंवार व्यक्त होते आणी याकडे लक्ष वेधण्याचे बरेच प्रयत्न सुरु आहेत. याबद्दल काही मुद्दे अधोरेखित करण्यासारखे आहेत.
मंत्रालयात आत शिरल्याबरोबर मुख्य उद्बाहनाशेजारीच कुसुमाग्रजांची कविता "स्वातंत्र्य देवीची विनवणी " वाचायला मिळते. त्यात स्वभाषेबद्दल म्हटले आहे --
“ पर भाषेतहि व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी |
माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपु नका ||
भाषा मरता देशाहि मरतो संस्कृतिचाही दिवा विझे |
गुलाम भाषिक होउनि अपुल्या प्रगतीचे शिर कापु नका ||”
सर्वच राज्यकर्ते व अधिकारी या ओळी वाचतात. पण लक्षांत कोण घेतो ?
आपल्या राज्यांत मराठी न शिकवणा-या शाळा तर आहेतच. पण कित्येक शाळांमध्ये मुलीमुलांनी आपसांतही मराठी बोलले तर शिक्षा होते. काही शाळांमधून पालकांना नोटीस वजा पत्र जातात की त्यांनी घरी देखील पाल्यांशी इंग्रजीतूनच बोलावे. अशा शाळांमधे मराठी हा एक विषय म्हणून शिकवला तरी त्याने मराठीची जपणूक होईल कां? हा गांभीर्याने विचार करण्याचा मुद्दा आहे.
मराठी माध्यमांच्या शाळेत पहिलीपासून इंग्रजी कम्पलसरी. इंग्रजी मिडीयमच्या शाळेत मात्र पहिलीपासून मराठी शिकवली जात नसली तरी चालते, असे कां?
या सर्व प्रश्नांमागे एक वेगळे व महत्वाचे तत्वज्ञान आहे. हा प्रश्न फक्त मराठी इंग्रजीचा नसून गरीबी श्रीमंतीचा आहे असे मला वाटते. इंग्रजी म्हणजे श्रीमंती - आज नसेल तर उद्या तरी. जशी गरीबी नको तशी ती गरीबपणाचे द्योतक असलेली मराठी पण नको. म्हणून मग घरकाम करणारी बाई पण अट्टाहासाने आपल्या मुलाबाळांना इंग्रजी शाळेतच घालते. मराठी ही भाषा हलाखीत दिवस काढणार्यांसाठी आहे. पण ज्याला थोडे बरे दिवस हवेत त्यांनी मराठीला मनसा वचसा पुसून टाकून इंग्रजीला कवटाळले पाहिजे हे ते तत्वज्ञान आहे. ते आपल्याला बदलतां येईल कां?
टीव्हीवर एकदा एका महागडया कारची जाहिरात पाहून मी म्हटले – पहा, जाहीरातीमधील सर्व बोलणे इंग्रजीतच आहे. त्यावर ऐकणा-याने म्हटले - मग? एवढी महागडी कार घेणारे लोक कांय मराठीत बोलतील? त्यानंतर लगेच सर्व शिक्षा अभियानाची जाहिरात पाहिली. त्यांत एक खेडूत अशिक्षित जोडपं मुलीच्या शाळेत आलेलं - बाई त्यांना इंग्रजीतून सांगतात - पहा रोशनीने आज सगळी गणितं बरोबर सोडवली.
मी त्या जाहिरातीकडे बोट दाखवल्यावर त्याच व्यक्तीने पुन: सांगितले - अहो पण रोशनीला श्रीमंत व्हायचे आहे ना - मग हे डायलॉग तरी कांय मराठीत असतील? श्रीमंत होऊ घातलेले कांय मराठीत बोलतात? हा मुद्दा खूप विचार करण्यासारखा आहे.
इंग्रजी मिडीयमच्या शाळांची भरमसाठ फी कांय दाखवते? हेच की आजच्या व्यापारी जगांत जो हे महाग शिक्षण घेईल त्यालाच पैशाचे महत्व कळून तो सुध्दा भराभर झटपट पैसे मिळवायच्या धंद्दाला लागेल. अशा प्रकारे श्रीमंती वाढेल व गरीबी हटावचे स्वप्न पुरे होईल.
दहावी नंतरचे पुढचे शिक्षण हटकून इंग्लिश मधून घ्यावे लागते. कुणी मराठीतून विषय शिकावा म्हटले तर पाठयपुस्तके नाहीत. पूरक वाचन तरी मराठीतून करू या म्हटले तरी पुस्तके नाहीत. मग मराठीची गळचेपी होणार नाही असा आशावाद कशाच्या आधारे बाळगायचा?
खूप लोक म्हणतात ज्ञानेश्वरी आहे, तुकोबा, रामदासांचे संत साहित्य आहे. मुक्ताई -बहिणाबाई - शांता शेळके -- इंदिरा संत या सारख्या कवयित्रिंचे वाङ्मय आहे. गडकरी, आपटे, पुल, गोनीदा, कुसुमाग्रज, विंदा, अत्रे, फडके यांसारख्या लेखकांचे वाङ्मय आहे. ते आहे तो पर्यंत मराठीला मरण नाही. मला हे पटत नाही. कारण हे खरे असेल तर शाळांमधे मराठीच्या उच्चाटनालाच हरकत घ्यायची कांय गरज आहे? पण तस नसत. आपणा सर्वांनाच समजतं की शाळेत मराठी आल्यामुळेच पुढील पीढी हे वाङ्मय वाचू शकेल. अन्यथा हे वाङ्मय देखील नष्ट होऊन जाईल.
म्हणजेच शाळातून मराठी टिकवायला हवी. त्यासाठी निव्वळ एक मराठीचा विषय घेणं पुरेस नाही तर सर्व अभ्यास मराठीतून करता आला पाहिजे. तो तसा करावासा वाटला पाहिजे. यासाठी असणारी पुस्तके कुठे आहेत? ती रटाळ आहेत की रंजक? साने गुरुजीनी म्हटले होते - करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे. तर मग पाठ्यपुस्तके रंजकतेने लिहिलेली कां नकोत? अशी रंजक पुस्तके लिहिण्यासाठी बाल भारती किती प्रयत्न करते? साहित्य संस्कृती मंडळाचे कांय प्रयत्न होतात? साहित्य संस्कृती मंडळात तर पाठयपुस्तके, शब्दकोष याला साहित्यच मानत नाहीत. माझ्या मते जे जे वाचायची गरज पडते ते ते साहित्य. ते रटाळ असेल तर वाईट साहित्य म्हणा, पण त्यालासुध्दा आधी साहित्य तर म्हणा. त्यामध्ये रंजकता, रोचकता व प्रमाणभूत (authentic ) असणे - हे गुण आले तर साहित्य - गुण वाढतात. पण मग असे रंजक पण शालेय अभ्यासाला उपयुक्त असणारे बाल वाङ्मय कोण लिहितात? अशा बाल वाङ्मयासाठी कुठले विशेष सन्मान किंवा पारितोषिके आहेत? तस काही पहायला मिळत नाही. उलट माझ्या बालपणांतील कित्येक बाल मासिके वाचक नाहीत म्हणून बंद पडलेली आहेत.
कधी काळी मला वाटत असे की, इंग्रजी ही ज्ञानार्जनाची भाषा असल्यामुळे तिच्या तुलनेत मराठी (किंवा हिंदी किंवा इतर सर्व प्रांतांच्या त्या त्या भाषा) मागे पडतात. म्हणून मला त्यावर उपाय वाटत असे की, आपापल्या भाषेत खूप खूप पुस्तके लिहून घेतली पाहिजेत. पण आजचे मराठी जग त्या बाळबोध कल्पनेच्या पुढे गेलेलं दिसत आहे. जागतिकीकरणाच्या धबडग्यामधे आपण सर्व गोष्टी पैशाने तोलू लागलो आहोत. त्यातच भारतीय मानसिकता अशी आहे की, इंग्रजी म्हणजे पैसा. इंग्रजी नसणे म्हणजे पैशाकडे पाठ फिरवणे. याच चष्म्यातून समाज-धुरीण, शाळा-चालक, व पालक या प्रश्नाकडे बघतात. हे नवे तत्वज्ञान खोडून काढण्यासाठी दीर्घकालीन लढा द्यावा लागेल. त्याचेही पहिले पाऊल पुस्तक निर्मितीचेच असेल. पण त्या अगोदर स्टॉक टेकिंग करावे असे मी सुचवू इच्छिते - बालभारती किंवा साहित्य संस्कृती मंडळाने सर्व प्रकाशकांकडून माहिती मागवावी -- त्यांनी गेल्या दहा वर्षात विविध विषयांवर शालेय विद्यार्थ्यांना पूरक वाचन म्हणून उपयोगी पडेल असे कांय कांय मराठी साहित्य प्रकाशित केले आहे? यासाठी नारळीकरांसारख्या एखाद्या लेखकाचे एखाद्या विषयावरचे पुस्तक हे इतरांना प्रेरणादायक ठरु शकेल. पण पुस्तकांची मोजदाद करुन त्यांना दाद देण्याच्या उपक्रमामुळे प्रेरणेबरोबरच प्रोत्साहन देखील मिळेल.
-------x-------
पत्ता : 15, सुनिती, जगन्नाथ भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, चर्चगेट, मुंबई- 400021.
kept on hindi_lekh_2
Friday, April 24, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
आपल्या लेखाशी पुर्णपणे सहमत. लहानपणा पासूनच आपल्या मुलांशी मराठीतून बोलून , मराठी बालगीते, कविता, गोष्टी यांची आवड निर्माण करणे आवश्यका आहे.
अवांतरः माझी आई सौ. उज्ज्वला केळकर,सांगली . यांच्या गंमत गाणी या लहान मुलांसाठी तयार केलेल्या ब्लॉगला अवश्य भेट देऊन आपला अभिप्राय द्यावा.
http://www.gammatganni.blogspot.com
आपल्या अनेकविध ब्लॉग्जची यादी पाहिली. एकेक ब्लॉग वाचण्यास सुरुवात केली आहे. तुम्ही संस्कृतदीपिका ह्या संकेतस्थळाचा दुवा दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार. आपल्यासारख्या सव्यसाची मंडळींमुळे महाजालावरील मराठी विश्व समृद्ध होत आहे ह्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.
Post a Comment