पावले टाकतच रहायचे आहे.
- लीना मेहेंदळे, भा.प्र.से.
माझा जन्म एका मध्यमवर्गी सामान्य कुटुंबातला पण IA S मधे आले - मोठ्या अधिकारपदाची नोकरी मिळाली - कौतुक झाल. थोड फार लेखन करत राहिले - त्याचही कौतुक झाल. नोकरीत सामाजिक भावना जपून ठेवली - म्हणूनही लोकमानसांत आपुलकी, कौतुक आणि आदर ही टिकून राहिला.
या सर्व प्रवासाकडे वळून बघतांना आणि पुढचाही विचार करतांना दिसते ती एक किशोर वयीन मुलगी - बारा तेरा वर्षांची. समाजात कांही तरी घडवायच आहे - कांही रूजवायच आहे - चांगुलपणा रुजवायचा आहे - ज्ञान वाढवायचे आहे - विचार आणि कार्यप्रवीणता वाढवायची आहे - ही भावना जपणारी एक मुलगी. आपण ते करू शकतो आणि येस, तेच करणार आहोत - ही भावना असलेली. तो पल्ला खूप लांबचा आणि तरीही नजरेच्या टप्प्यांत आहे असं तेंव्हाही वाटत होत आणि अजूनही वाटत. बरच कांही केल - खूप कांही करता आल नाही, पण करायचे दिवस तर अजून पुढे खूप लांब पर्यंत दिसतात. तेंव्हा न थकता करत रहायच आहे. आजही मला माझ्या जागी ती बारा तेरा वर्षांची मुलगीच दिसते. तिने अजून कांहीच केलेल नाही आणि करायच तर खूप खूप आहे.
मी IA S च्या नोकरीत आले त्याच सुमारास लग्नही झाले. मला महाराष्ट्र कॅडर मिळाल्यामुळे मी आणि मिस्टर मेहेंदळे यांनी पुण्यांत स्थिर होण्याचा निर्णय घेतला. नोकरीच्या अनुषंगाने बदल्यांचे प्रसंग आले ते स्वीकारायची मनाची तयारी केलेली होती. दोन मुले झाली त्यांना नीटपणे वाढवायची व चांगले संस्कार घडवण्याची जबाबदारी देखील याच काळांत आली. त्यांत माहेर व सासर मधील सा-यांनीच मदत केली.
मला लहानपणापासून खरेपणाचे नितांत मोल वाटत आलेले आहे. स्वन्पातले वचन देखील चुकवणार नाही असे म्हणणारा सत्यवादी राजा हरिश्चंद्र, सत्यवचनामुळे जो मर्यादा पुरूषोत्तम ठरला तो श्रीराम आणि सत्य वचनामुळे ज्याचा रथ जमीनीपासून दोन अंगुळ वरून चालायचा युधिष्ठिर - या कथांनी माझ्यावर खरे बोलण्याचे संस्कार केले. तसेच युधिष्ठिराची न्यायप्रियता खूप भावली.
योग: कर्मसु कौशलम् हा कर्मकुशलतेचा सिद्घान्त, तसेच झाडे - पशु - पक्षी - माती - एकंदर पर्यावरणाचे संरक्षण, सत्य व न्यायबुद्घी हे संस्कार मुलांमधे यायचे असतील तर ते आपण आपल्या उदाहरणावरून दाखवल्या शिवाय मुलांमधे कसे उतरणार? म्हणूनच बालपणापासून मनावर उमटलेले हे संस्कार मुलांना वाढवण्याच्या काळांत अधिकच पक्के झाले. म्हणूनच नोकरीतले कामही उठावदार होऊ शकले.
मी असिस्टंट कलेक्टर व ऍडिशनल कलेक्टर म्हणून पुण्यांत काम केले. त्या आठवणींबाबतचा लेख माझी प्रांतसाहेबी मौजने 1998 दिवाळी अंकात प्रसिद्घ केला. मधेच दहा महिने मंत्रालयात शिक्षण विभागात उप सचिव म्हणून आले. त्याच वेळी व्यवसाय शिक्षण हा नवीन विषय मांडला जात होता ते सर्व काम माझ्याकडे आले. व्यवसाय शिक्षणाची किती मोठी गरज आहे, त्याचे फायदे, त्याची व्याप्ती इत्यादी धोरणात्मक टिप्पण्या तयार केल्या. पुण्याला संचालनालय उघडले. पण आज 30 वर्षानंतर आपण कुठे आहोत ? महाराष्ट्रांत दहा ते पस्तीस वयोगटात सुमारे साडेचार कोटी लोकसंख्या आहे. या पैकी फार कमी लोकांना प्रचलित शिक्षणातून चांगली नोकरी मिळू शकते. इतरांना व्यवसाय शिक्षणच तारू शकते. पण आजही आपल्याकडे वर्षाला फक्त जेमतेम अडीच लाख विद्यार्थीच व्यवसाय शिक्षण घेऊ शकतात. म्हणजे माझे तेंव्हाचे प्रयत्न वाया गेले असे म्हणायचे कां ? पण इतर पोस्टिंग्स करतांना विशेषत: W M D C व P C R A च्या काळांत याच संकल्पना उपयोगी पडल्या आणि आता सामाजिक विकास समन्वय ही जबाबदारी पार पाडतांना समाजाच्या विकासातील मोठा गॅप भरून काढण्यासाठी व्यवसाय शिक्षणाची व्याप्ति वाढवा, तसेच त्यातील प्रचलित रटाळ पद्घती काढून नवीन पद्घती वापरा - उदा. व्हिडीयो - अस मी ठामपणे सांगू शकते.
औरंगाबाद आणि सांगली जिल्हापरिषदेत असतांना वॉटर कन्झर्व्हेशन, शिक्षण, ग्रामीण स्वच्छता, गोबर गॅस प्लॅन्ट या विषयांवर खूप शिकायला आणि प्रयोग करायला मिळाले. सांगलीला कलेक्टर असतांना जत तालुक्यांतील येलम्माच्या देवळांत देवदासी म्हणून मुलींना सोडायची प्रथा होती - ती बंद करायला गेले आणि त्यांतून देवदासींच्या आर्थिक पुनर्वसनाचा अभिनव कार्यक्रम हाती घेतला. पुढील चार वर्षांत या कामाला चांगले यश आले, पण माझी W M D C ची पोस्टिंग संपली आणि हे काम W M D C ने हे काम हळू हळू मागे टाकले. त्या कामांतून कितीतरी गोष्टी पुढे आल्या. शासनाची अतिशय चुकीची ऑडिट सिस्टम, विकासाच्या योजनांमधे रिस्क ऍनॅलिसिस चे तंत्र न शिकवल्यामुळे व रिस्क फॅक्टर ची दखल न घेतल्यामुळे काम न करणारा अधिकारी सगळ्यांत सेफ - कारण त्याच्याकडून ऑडिटच्या चुका घडूच शकत नाहीत, काम करणारा अधिकारी मात्र अनसेफ कारण प्रसंगी त्याचे निर्णय चुकू शकतात, तंत्र शिक्षणातील एकांगीपणा - त्यामध्ये उद्योजकता व फॉरवर्ड - बॅकवर्ड - लिंकेजेसच्या प्रशिक्षणाचा अभाव असें सर्व मुद्दे प्रकर्षाने जाणवले. स्त्रियांच्या प्रश्नांचे
विविध कंगोरे या दोन ग्रामीण पोस्टिंग मधून कळले. सांगलीच्या एका दूरस्थ गांवातील वृद्घ महिलेने म्हटलेले शब्द नेहमी आठवतात - “बाई, कधी नव्हे ते तू बाईमाणूस कलेक्टर झालीस. मग दारूपायी कसे बायामाणसांचे संसार धुळीला मिळतात ते बघ - नवरा मारहाण करतो - मुलांचे हाल बघवत नाहीत - या काबाडकष्टांत बाई कशी जगते ते पहा आणि तुझी कलेक्टरकी वापरून आधी सर्व दारूची दुकानं बंद कर. त्या शिवाय ग्रामीण स्त्रीच आयुष्य सुखी होणार नाही”.
माझ्या पटीने मी शाळेच्या किंवा धार्मिक स्थळांच्या आसपास चालणारी, अनधिकृतपणे चालणारी दुकाने बंद करू लागले. एका शाळेजवळील अनधिकृत दुकान काढण्यासाठी मी जातीने तिथे उभी राहिले. आजूबाजूला कित्येक गांवकरी, शाळकरी - मुले ते दृश्य पहात होती. खूप वर्षांनी एका व्यक्तीने फोनवर आठवण सांगितली - बाई, त्या दिवशी मी पण तिथेच होतो - शाळेच्या सातवीचा विद्यार्थी. मी व माझ्या मित्रांनी म्हटले - असाच अधिकारी पाहिजे. त्याच दिवशी आमच्या शिक्षकाच्या मुलीचे बारसे झाले. सर्व विद्यार्थ्यांनी आग्रहाने तिचे नांव लीना ठेवले. आज मी केंद्र शासनात क्लास वन अधिकारी आहे. माझ्या तर्फे शक्य तेवढे सिन्सिअरली व ईमानदारीने काम करतो. काही लोकोपयोगी काम होईल हा प्रयत्न करतो.
सांगलीहून बदलून W M D C मधे रूजू झाल्यावर सांगलीला सुरू केलेले देवदासी आर्थिक पुनर्वसनाचे काम आता सोडून द्यावे लागणार अशी खंत होती - कारण हे पडले उद्योग खाते. ही खंत घेऊन विद्यार्थी सहायक समितीच्या डॉ. अच्युतराव आपटे यांना भेटले आणि त्यांनी ब्यूरोक्रसीच्या झापडबंद चौकटी कशा तोडाव्यात ते शिकवले - “W M D C मधे तुम्हाला देवदासींचे काम का करता येणार नाही - बघा एकदा W M D C चे सर्व नियम उलगडून”. मी पाहिले - खरेच त्यांना शेवटचे सर्वसमावेशक कलम होते - उद्योजकता वाढीसाठी जे करावे लागेल ते सर्व. मग आम्हीं तरी देवदासींना उद्योगाकडेच वळवायचे म्हणत होतो ना ! या मुद्याला अध्यक्ष श्री.उल्हास पवार व सर्व सदस्य आणि अधिका-यांनी साथ दिली आणि आम्हीं पुढील तीन वर्षे तो उपक्रम राबवला. शासनस्तरावर मात्र हे काम समाज कल्याण विभागानेच करायचे (आता महिला कल्याण विभागाने) असा दंडक होता कां - हा अजूनही अनुत्तरित प्रश्न त्यांना उद्योजकता या शब्दाची - अनभिज्ञता. त्यामुळे देवदासी असेल तर पेन्शन आणि लग्नांत मंगळसूत्र अशा दोन योजना !
आपल्या योजना आत्मनिर्भरतेकडे नेणा-या कां नसाव्यात ? कारण तशा योजना राबवायला चिकाटी, वाट पहाण्याची तयारी आणि ध्यास हे गुण अत्यावश्यक आहेत. त्याऐवजी पटकन - दिले म्हणणं कितीतरी सोपं. मला एका रिटायर्ड मुख्याध्यापकांनी सांगितलेली शिकवण आठवते - शंकराला अभिषेक करायचा असेल तर अभिषेकपात्र धाडकन उपड करून नाही चालत. थेंबा थेंबाने अभिषेक व्हावा लागतो आणि तेवढा वेळ - तुम्हाला समोर बसावे लागते. तेवढी चिकाटी नसेल तर अभिषेकाचा संकल्प सोडू नका.
-------------------------------------------------------------------------------------
मटा. दि. 22 जून 2008
Read here too
वेब 16 वर मंगल व pdf file.
Wednesday, June 18, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
मेडम,
आपल्या सारखे अधिकारी विरळाच. आपण समाजासाठी जे केल/ करित आहात त्या बद्दल आपले आभार मानायला हवेत.
Post a Comment