महाराष्ट्रातील डाव्या विचारपरंपरेचे महत्त्वपूर्ण घटक असलेल्या कॉम्रेड गोविंद पानसरे यांची काही महिन्यांपूर्वी गोळ्या झाडून भ्याड हत्या करण्यात आल्याने अवघ्या राज्यास धक्का बसला. पानसरे यांना दाभोलकरांप्रमाणेच मृत्युपश्चात अमाप प्रसिद्धी मिळाली. माध्यमांनी एका ज्येष्ठ डाव्या, लोकशाहीवादी नेत्याची हत्या होताना मूक साक्षीदार बनलेल्या सरकारला धारेवर धरले, आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याची जाणीव विशेषत: वृत्तवाहिन्यांना अचानक झाली आणि पानसरे यांचा कधी साधा नामोल्लेखही न केलेल्या माध्यमांनी त्यांना तमाम मराठी जनतेचा लोकनायक बनविले. पानसरे यांच्या हत्येस अवाजवी महत्त्व दिले गेले आहे, असे मत मांडण्याचा उद्देश येथे नक्कीच नाही; परंतु पानसरे हे जिवंत असताना त्यांना वाजवी महत्त्व न दिलेल्या माध्यमांनी आपल्या बेगडी स्वभावधर्मास तत्काळ जागून पानसरे यांचा मृत्यु आकर्षक आवरणात विकण्यास सुरुवात केली व आलम महाराष्ट्रास एक अतुलनीय व्यक्तिमत्त्व गमाविल्याचे दु:ख झाले.
पानसरे यांच्या मृत्युनंतर त्यांच्या "शिवाजी कोण होता‘ या पुस्तिकेचा खप अचानक प्रचंड वाढला. पानसरे यांच्या हयातीत पाच रुपयांस विकल्या जाणाऱ्या या पुस्तिकेचा भाव अचानक वधारला; आणि सध्या तिचे मूल्य 25 रुपये इतके झाले आहे. तेव्हा पानसरेंच्या मृत्युने या पुस्तिकेस व विक्रेत्यांस सुगीचे दिवस आले, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. इथपर्यंतही सर्व काही ठीकच होते. मात्र पानसरे यांच्या खूनानंतर आपण किती मोठा इतिहासकार गमाविला, याविषयीची हळहळ विद्वत्तेचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यासहित संपूर्ण राज्यामधील स्वघोषित विचारवंतांनी अत्यंत संवेदनशीलतेने व्यक्त केली. जिवंतपणी पानसरे यांच्या पुस्तिकेस ऐतिहासिकदृष्ट्या मृत्तिकेचीही किंमत नव्हती, हेच वास्तव आहे आणि आता पानसरे यांच्या मृत्युच्या निषेधार्थ; व महाराष्ट्रात येत असलेल्या "विचारस्वातंत्र्याविरोधातील अलिखित दडपशाही‘संदर्भात उर बडविणाऱ्या किती जणांनी ही पुस्तिका तेव्हा वाचली होती, हा प्रश्न विचारणे निव्वळ अप्रस्तुत ठरेल. स्वत:स पटलेल्या, उमजलेल्या मार्गाने सार्वजनिक कार्य करत असलेल्या सर्व कळकळीच्या माणसांना अशा भुक्कड छचोर वृत्तीचा तिटकारा असतो व पानसरे यांनीही या दांभिकपणाचा तीव्र शब्दांत समाचारच घेतला असता. हा वाहत्या वाऱ्याबरोबर पाठ फिरविणारा संधीसाधुपणाच समाजमान्य सत्यास वर्तमान वास्तवतेच्या कसोटीवर निरखून पाहण्यापासून रोखत आहे. पानसरे यांच्या पुस्तिकेसंदर्भात एरव्ही एवढा वाद झाला नसता; परंतु युगपुरुष शककर्ते शिवाजी महाराज यांच्यावरील ही पुस्तिका आहे व त्याला सध्याच्या राजकारणाचा संदर्भ आहे, ही बाब नजरेआड करता येत नाही. त्यामुळेच पानसरे यांच्या या पुस्तिकेचे पुन्हा एकदा परीक्षण करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रामधील शिल्लक समाजवादी विचारसरणीच्या परंपरेतून प्रसविण्यात आलेले हे नवसाहित्य आहे. या पुस्तिकेच्या अनुषंगाने एकीकडे महाराजांना निधर्मीवादी बनविण्याचा वैचारिक ऊत "बुद्धिवाद्यांना‘ चढला आहे; तर दुसरीकडे महाराजांची हिंदुधर्मरक्षक, आक्रमक (हिंसक...) प्रतिमा ठासून मांडण्याचाही प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवरही हे विश्लेषण आवश्यक आहे.
या पुस्तिकेच्या विश्लेषणाआधी पानसरे यांचे हे लिखाण मुळात निखळ इतिहास नाही, ही बाब ध्यानी घ्यावयास हवी. आदर्श समाजाचे नियम कसे असावेत, राज्यव्यवस्थेची वाटचाल कोणत्या मार्गाने व्हावी, सार्वजनिक आयुष्यात धर्माचे स्थान काय असावे; या व अशा अनेकानेक महत्त्वपूर्ण प्रश्नावर समाजवादी विचारसरणीच्या परंपरेतून आलेल्या एका अत्यंत चांगल्या माणसाने मांडलेली ही मते आहेत. त्यामध्ये सामाजिक कळकळ आहेच; परंतु पूर्वग्रहही आहे, आदर्श राज्यव्यवस्थेची स्वप्निल दृष्टी आहेच; परंतु इतिहास या सर्वमान्य अभ्यास शाखेचे अज्ञानही आहे, सध्याच्या अन्यायाविषयी, असमतेविषयी पराकोटीची चीड आहेच; परंतु विशिष्ट उद्देश व विचार डोळ्यांसमोर ठेवून केलेले सोयीचे लेखनही आहे, समाजहितेषु सुधारणावादी दृष्टिकोन आहेच; परंतु अपार राजकीय भाबडेपणाही आहे. शिवाय पानसरे यांनीही अत्यंत मोठेपणाने आपण या पुस्तकात काहीही "शोधले‘ नसून इतरांनी लिहून ठेवलेल्याची उसनवारी केल्याचे मान्य केले आहे. ""तपशील व संदर्भ अर्थात इतरांचे. मांडणी माझी,‘‘ असे पानसरे यांनी पुस्तिकेच्या पहिल्या प्रस्तावनेत स्पष्ट केले आहे. आपल्या लिखाणाचे पितृत्व हे सर्वस्वी आपले नाही, हे मान्य करण्यासाठी धैर्य लागते; व ध्येयस्थ पानसरे यांच्याकडे ते निश्चितच होते. शिवाय, कोणत्याही इतिहासासंदर्भात करण्यात आलेल्या लिखाणासाठी वापरण्यात आलेल्या समकालीन संदर्भग्रंथांच्या अन्वये नव्या लिखाणाचे मूल्य ठरत असते. पानसरे यांनी आपल्या पुस्तिकेच्या शेवटी दिलेल्या संदर्भसूचीमध्ये विशद करण्यात आलेल्या ग्रंथांपैकी केवळ सभासद बखर व महराजांची वा अमात्यांची आज्ञापत्रे हे शिवकालीन साहित्य आहे. यामध्ये जेधे शकावली, कवींद्र परमानंद यांचे शिवभारत, जयराम पिंडे, इतर समकालीन मुघल ग्रंथ वा तत्कालीन संतसाहित्याचा मागोवा नाही. मुळात पानसरे इतिहासावर कोणत्या आधाराने लिहित आहेत? त्यांचा दख्खनी उर्दूचा अभ्यास होता काय? त्यांना फारसी येत होती काय? त्यांनी तत्कालीन मोडी साहित्याचा व्यासंग केला होता काय? शिवचरित्राची महत्त्वपूर्ण साधने मानण्यात येणाऱ्या डच, फ्रेंच व पोर्तुगीज पत्रव्यवहाराचा अभ्यास त्यांनी केला होता काय? नाही. त्यामुळेच पानसरे यांची ही पुस्तिका निखळ ऐतिहासिक दस्ताऐवज म्हणता येत नाही. पानसरे यांच्या पुस्तिकेवरुन महाराष्ट्राला नवा इतिहास शिकविण्याचे अवसान चढलेल्या वैचारिक भाटांनी ही बाब सर्वप्रथम ध्यानी घेणे आवश्यक आहे.
"शिवाजी कोण होता‘ या पुस्तिकेमधून वतनदारी नष्ट करण्याची क्रांतिकारी भूमिका, न्याय्य शेतसारा, स्त्रियांचा सन्मान व सुरक्षितता, शेतकऱ्यांचा जाणता राजा, उद्योगांना व व्यापारास संरक्षण देण्याचा द्रष्टेपणा अशा महाराजांच्या अनेक अतुलनीय गुणांचा पानसरे यांनी गौरवपूर्वक उल्लेख केला आहे. महाराजांच्या लोकविलक्षण व्यक्तिमत्त्वाच्या छत्रछायेमध्ये नव्या तेजाने वारंवार उजळून निघालेल्या जवळपास सर्वच स्वभाववैशिष्टयांची इतर लेखकांप्रमाणेच पानसरे यांनीही प्रशंसा केली आहे. "शिवाजी हा प्रशासन, युद्धकुशलता, न्यायवृत्ती व अंमलबजावणी, पराराष्ट्र संबंध, सामाजिक धोरण, विज्ञानवादी दृष्टिकोन अशा सर्वच आघाड्यांवर एका वेळी अधिराज्य गाजविलेला रयतेचा लोकविलक्षण राजा होता,‘ याबाबत इतिहासकारांमध्ये कोठेही दुमत नाही. किंबहुना ब्रिटीश, मुघल वा इतर साहित्यानेही त्यास सशक्त दुजोराच दिला आहे. येथपर्यंत महाराजांमुळे समाजमनामध्ये विविध वैचारिक मतभेदही उत्पन्न होण्याचे फारसे कारण नाही. तेव्हा महाराजांच्या आयुष्यावरुन विविध विचारसरणींचे विचारकलह माजण्याचे कारण म्हणजे अर्थातच महाराज व एकंदरच शिवकाळाची धार्मिक व सामाजिक दृष्टिकोनांमधून करण्यात येणारी चिकित्सा होय. पानसरे यांनी "शिवाजी हा धर्मश्रद्ध तर खराच; मात्र सध्या त्याला रंगविण्यात येत असल्याप्रमाणे इस्लामविरोधी नक्कीच नव्हता,‘ या सूत्राच्या पायावर आपली मांडणी उभी केली आहे. वरवर पाहता या मांडणीमध्ये काहीही गैर आढळणार नाही. परंतु या मांडणीच्या पुष्टयर्थ पानसरे यांनी दिलेल्या विविध हास्यास्पद तर्कांच्या विश्लेषणानंतर या सदोष मांडणीमागील वैचारिक उद्देश स्पष्ट होईल. शिवाय, महाराजांचे युगप्रवर्तक कार्य या मांडणीमधून पुरेसे स्पष्ट होते नाही. येथे एका महत्त्वपूर्ण मुद्याचा विचार करणे आवश्यक आहे. शिवाजी रयतेचा राजा होता हे तर निर्विवाद सत्य आहे. शिवाजीने प्रस्थापितांच्या अन्यायकारक व्यवस्थेविरोधात यशस्वी लढा उभारला हेदेखील सत्यच. आणि भीषण अंधकाराच्या काळात आधुनिक राज्यव्यवस्थेस लाजविल असे न्यायाधिष्ठित राज्य स्वपराक्रमाने उभारण्यात शिवाजी यशस्वी झाला, हेही खरेच आहे. मात्र महाराजांचे व्यक्तिमत्त्व हे अवकाशास स्पर्श करणारे आहे. अशा मांडणीनंतरही या अविश्वसनीय शिवकाळाचा पूर्णत: मागोवा घेण्यात यशस्वी झाल्यासारखे वाटत नाही. लोकराजा ही पदवी जगाच्या इतिहासात अनेकांनी पराक्रमाने मिळविली आहे. खुद्द महाराष्ट्रातही हल्ली रयतेचे राजे, जाणते राजे बरेच आहेत! स्वत:चे राज्यही अनेकांनी निर्मिले आहे. प्रस्थांपितांविरोधातील लढ्याचा तर प्रदीर्घ इतिहास आहे. सामान्यत: समाजवादी परंपरेतील शिवकाळाचे विश्लेषण येथे खुंटते. परंतु यानंतरही महाराजांचे विशाल व्यक्तिमत्त्व दशांगुळे व्यापून समोर उभे असल्याचे भासते. तेव्हा शिवरायांचे वेगळेपण नेमके कशामध्ये आहे? हे वेगळेपण शोधताना रुळलेली आर्थिक-राजकीय वाट सोडावी लागते व इतर शाब्दिक आकडेवारीमध्ये मांडता न येणाऱ्या (इनटॅंजिबल) घटकांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते.
"शिवाजी हा धर्मश्रद्ध तर खराच; मात्र सध्या त्याला रंगविण्यात येत असल्याप्रमाणे इस्लामविरोधी नक्कीच नव्हता,‘ ही मुळात अगदीच सरधोपट मांडणी आहे. कारण मुद्दा मुळात महाराजांचे सर्वसमावेशक धोरण हा नसून; शिवकाळात नव्याने लाट आलेल्या इस्लामी धर्मवेडाचा आहे. परंतु त्याला अनेकदा सोयीस्कर बगल दिली जाते, ही खरी समस्या आहे. महाराज इस्लामद्वेष्टे नव्हतेच; परंतु त्यांनी मोडून काढलेले आव्हान हे निव्वळ प्रस्थापितांचे अन्यायकारक आव्हान नव्हते; की तो निव्वळ आर्थिक शोषणाविरुद्धचा यशस्वी लढा नव्हता. तेव्हा शिवरायांचे वेगळेपण नेमके कशामध्ये आहे? महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण वा भारतातील अन्य व्यक्तिमत्त्वांच्या तुलनेत शिवराय सूर्यासारखे अढळ तेजाने तळपताना का आढळतात? कारण शिवरायांनी देशात केवळ आणखी साम्राज्याची निर्मिती केली असे नाही; तर महाराष्ट्रावर व एकंदरच देशावर त्या काळी नव्याने झालेल्या एका राजकीय-सांस्कृतिक आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार करुन दाखविला. यामुळेच महाराजांच्या अनेक गुरुंमध्ये याकुत बाबांचा समावेश होता, ही बाब आश्चर्याची नाही; तो मूळ हिंदुस्वभावच आहे. मात्र स्वसंस्कृतीचा सृजनशील उत्सव असणाऱ्या महाराष्ट्र धर्माची पताका त्यांनी आयुष्यभर यशस्वीपणे वागविली; नव्हे आपल्या व्रतस्थ आयुष्याने तत्कालीन हिंदुसमाजास नवे आत्मभान मिळवून दिले, ही खरी उल्लेखनीय बाब आहे. मात्र त्याआधी, पानसरे यांच्या तर्कांची शहानिशा करणे अगत्याचे आहे.
"शिवाजी इस्लामविरोधी नव्हता; कारण त्याच्या सैन्यात अनेक मुस्लिम सरदार, सैनिक होते,‘ असे मत पानसरे यांनी व्यक्त केले आहे. महाराज इस्लामविरोधी नव्हते, यात तर काहीच शंका नाही. परंतु ही मांडणी सर्वथा अज्ञातमूलक आहे. महाराजांच्या सैन्याच्या तुलनेत निव्वळ विराट असलेल्या मुघल बादशहा औरंगजेब याच्या सैन्यातील निव्वळ हिंदु सरदार, दरकदार, सैनिकांचीच संख्या महाराजांच्या एकूण सैन्यापेक्षा कितीतरी अधिक होती. मग औरंगजेबही हिंदुविरोधी नव्हता असे म्हणायचे का? ब्रिटीशांच्या राज्यात भारतीय सैनिकांची संख्या गोऱ्यांच्या किमान पाचपट होती. म्हणून ब्रिटीश भारतविरोधी नव्हते काय? कोणत्याही राजास एतद्देशीय सैन्याच्या सहाय्यानेच राज्याचा कारभार पहावा लागतो. तेव्हा अशा रस्त्यावरील वादांसदृश प्रसंगी केल्या जाणाऱ्या विधानांना काहीही ऐतिहासिक अर्थ नाही. महाराज इस्लामविरोधी नव्हते; मग त्यांच्या तेज:पुंज धोरणामागील मूळ प्रेरणा ती कोणती? सर्व धर्म हे एकाच प्रकाशमान सत्याकडे, ईश्वराकडे घेऊन जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत, या पारंपारिक धर्मनिरपेक्ष हिंदु मांडणीमधून जन्मास आलेले सश्रद्ध मन ही महाराजांच्या क्रांतिकारी धोरणामागील मुख्य प्रेरणा होती. मात्र त्यावर धर्मभोळेपणाची पुटे चढलेली नव्हती; तर वास्तविकतेच्या पोलादी चौकटीत या प्रेरणेची जडणघडण झालेली होती. महाराजांची सश्रद्ध मन हे "सदगुणविकृती‘च्या अतिरेकाचे गुलाम नव्हते; तर त्याला नितळ प्रवाहाचे सातत्य होते. शरणागतास मरण नाही, अशा उदार मनाने हाती आलेल्या बहलोल खानास सोडलेल्या कुडतोजी गुजरांना खरमरीत पत्र पाठविलेल्या महाराजांच्या मनास पृथ्वीराज चव्हाणाप्रमाणे धार्मिक अतिरेकातून येणारा आत्मघातकी अविवेक शिवला नव्हता. तेव्हा अशा युगंधर व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषण करताना अधिक गांभीर्याने व खोलपणे विचार करणे आवश्यक आहे.
पानसरे यांनी महाराज इस्लामविरोधी नव्हते, इथपर्यंत मर्यादित भूमिका घेतली असती; तर वादास कोणतेही कारण उत्पन्न होत नव्हते. मात्र डाव्या गोटाचे पाईक असलेल्या पानसरे यांनी एकनिष्ठतेने महाराजांच्या मनोभूमिकेस निधर्मी/धर्मनिरपेक्षतावादी झालर लावण्याचा प्रयत्न केल्याने या पुस्तिकेतील सामान्यपणा अधिक प्रकर्षाने जाणवतो. धर्मनिरपेक्षतेचे हे भूत भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधून जन्मास आले व तेव्हापासून त्याची पडछाया भारताच्या इतिहासापासून ते विज्ञानापर्यंत आणि राजकारणापासून ते साहित्यापर्यंत सर्व क्षेत्रांवर पडलेली आहे. नरहर कुरुंदकरांनी धर्मनिरपेक्षतेचे चार भाग केले आहेत. यामधील चौथ्या कल्पनेची मांडणी करताना "आधुनिक भारतामध्ये महात्मा गांधीनी या कल्पनेभोवती सारे भारतीय राजकारण उभे केले. तेव्हा शिवाजी महाराज व्यक्तिगत जीवनात धार्मिक असूनही धर्मनिरपेक्ष नेते आहेत, असे म्हणताना भारतीय संविधानाने पुरस्कारलेली ही चौथी धर्मनिरपेक्षतेसंदर्भातील कल्पनाच डोळ्यांपुढे असते,‘ असे कुरुंदकरांनी म्हटले आहे. पानसरे यांनीही साधारणत: अशाच स्वरुपाची मांडणी केली आहे. पानसरे यांनी "शिवाजी हा निधर्मी नव्हताच; परंतु तो हिंदु धर्माचा आदर करताना मुस्लिम धर्माचा द्वेष करत नव्हता,‘ असे म्हटले आहे. मुळात धर्मनिरपेक्षता असो; वा आक्रमक हिंदुत्व, या दोन्ही संकल्पना अलिकडच्या काळातील आहेत. तेव्हा भारतीय इतिहासातील जुन्या व्यक्तिरेखांना यांपैकी कोणत्यातरी एका रंगात रंगविण्याची ही काय हौस आहे, ते समजत नाही. धर्म हाच ज्याकाळी मानवाच्या आयुष्याचा मूलाधार होता; अशा शिवकाळातील व्यक्तिमत्त्व हे धर्मसापेक्ष होते, असे आपण सरधोपटपणे म्हणू शकतो काय? किंबहुना एखाद्या ऐतिहासिक कालखंडाचे विश्लेषण करताना केवळ धर्म ही ऐतिहासिक प्रेरणा ज्याप्रमाणे असू शकत नाही; त्याचप्रमाणे धार्मिक भूमिकेतून करण्यात आलेले विश्लेषण पूर्णत: नाकारणे, हाही खरा वस्तुनिष्ठ विज्ञानवादी दृष्टिकोन असू शकत नाही. यामुळे इतिहासाचा प्राण असलेल्या वस्तुनिष्ठतेच्या मूल्याच्या गळ्यासहच नख लावले जाते. अशा वेळी वस्तुनिष्ठतेकडे दुर्लक्ष करुन मनुष्य आपल्या वैचारिक पार्श्वभूमीचा आधार घेऊन इतिहासासंदर्भातील मत व्यक्त करतो. त्यामुळे त्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेवर त्याच्या मताचा शिक्का मारला जतो व तिच्यावर अन्याय होतो. पानसरे यांनीही हेच केले आहे. विशिष्ट विचारसरणी असणे गुन्हा नाही; मात्र त्याचा पगडा जास्त झल्यास बुद्धिप्रामाण्यवाद लयास जातो व सोयीचे लेखन केले जाते.
मुळात महाराजांसह अनेक हिंदु राजे प्रतिनिधित्व करत असलेल्या हिंदुधर्माच्या या शिकवणुकीमध्ये इतर धर्मांचा द्वेष करणे बसतच नाही. यालाच धर्मनिरपेक्ष राजकारण म्हटल्यास हरकत नसते; मात्र आदर्श हिंदु राजा म्हटल्यास इतिहासाचे राजकारण केल्याचा आरोप केला जातो. मुळात धर्मनिरपेक्षता ही संकल्पनाच नवी असल्याने ऐतिहासिक काळातील व्यक्तिरेखेसंदर्भात मांडणी करताना जुन्या संकल्पनांच्या आधार घेतल्यास ते अनैतिहासिक वा पूर्वग्रहदुषित ठरत नाही, हे ध्यानी घेणे आवश्यक आहे. क्रिकेट या खेळाबद्दल असे गंमतीने म्हटले जाते, की हा मुळातील भारतीय खेळ ब्रिटीशांनी शोधून काढला! यामधील गंमत सोडली, तर डाव्या समाजवादी प्रेरणेमधील इतिहासलेखन अशाच स्वरुपाचे आहे. शिवाजी महाराज हे महात्मा गांधी यांनी घालून दिलेली धर्मनिरपेक्षतेची परंपराच पाळत होते, या विधानामधील उघड विरोधाभास विचारवंत म्हणविल्या जाणाऱ्यांच्या लक्षात येत नाही काय?! पानसरे यांच्याही मांडणीमध्ये धर्माच्या अभ्यासाचा पूर्ण अभाव, हे सर्वांत मोठे न्यून आहे. महाराजांना आजच्या राजकारणाच्या संदर्भात हिंदु धर्मरक्षक म्हणून ठरविणे योग्य नाहीच; परंतु त्यापेक्षा कितीतरी अधिक चूक त्यांना निधर्मी - धर्मनिरपेक्षतावादी ठरविणे आहे. मुळात या वादाची पार्श्वभूमी पानसरे यांच्यासारखे इतर समाजवादी, डावे इतिहासकारही सोयीस्कररित्या विसरत आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतिहासाच्या झालेल्या पुनर्लेखनानंतर प्रत्येक भारतीय नायकास धर्मनिरपेक्षतेचा शेंदूर फासण्यात आला. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रेरणेने इतिहासाचे विशिष्ट विचारसरणीच्या उद्देशाने लिखाण करण्याची नवी परंपराच देशात सुरु झाली. देशामधील समाजवादी लोकशाही परंपरेस सोयीच्या नसलेल्या इतिहासास सरळ अडगळीत टाकण्यात आले. दशकानुदशके झालेल्या या प्रकारानंतर महाराजांसारख्या इतर व्यक्तिरेखांच्या कामगिरीची आता आक्रमक हिंदुत्वाच्या भूमिकेमधून पुनर्मांडणी करण्यास सुरुवात झाली. धर्मनिरपेक्षतेच्या कोनाड्यात अडगळीसारख्या टाकून दिलेल्या भारतीय मनाच्या मानबिंदुंना हिंदुत्ववादी प्रवृत्तींनी राष्ट्रवादी भूमिकेतून साद घालण्यास सुरुवात केल्यानंतर पानसरे यांच्यासारख्या इतर अनेक जणांना ही आपत्ती वाटली. मात्र आधी विचारसरणीच्या आहारी जाऊन इतिहासाच्या वस्तुनिष्ठतेशी तडजोड करत केलेल्या मोडतोडीचे हे पाप इतक्या सहजासहजी पाठ सोडणार नाही. आक्रमक हिंदुत्ववाद ही देशातील फसव्या राजकारणकेंद्रित धर्मनिरपेक्ष धोरणास उमटलेली प्रतिक्रिया आहे, ही बाब लक्षात ठेवणे गरजेचे आहे. यामुळे इतिहासासहित साहित्य, राजकारण, कला अशा सर्व क्षेत्रांमध्ये ही प्रतिक्रिया उमटणार हे ध्यानी घेणे आवश्यक आहे.
""आक्रमक मुस्लिम सैन्यानं सत्ता काबीज करताना व राज्यविस्तार करताना हिंदुंची देवळे फोडली व लुटली हे सत्य आहे. परंतु ते पूर्ण सत्य नाही. लुटीची संपत्ती मुख्य, धर्म दुय्यम. मुख्य हेतु साध्य करायला आवश्यक म्हणून देवळे पाडत. देवळाभोवतालच्या लोकांना नाउमेद करणे, त्यांची लढण्याची उर्मी मोडून त्यांच्यात भय निर्माण करणे हासुद्धा हेतु असे,‘‘ अशी भूमिका पानसरे यांनी मांडली आहे. परंतु हेदेखील पूर्णसत्य नव्हे! प्रत्येक बाब आर्थिक दृष्टिकोनामधून पहावयास सुरुवात केली म्हणजे असे होते.. महाराजांनीदेखील सुरतेची दोनदा लूट केली, कारंजा शहर लुटले, आदिलशाही व मुघल साम्राज्यांमधील अनेक शहरांवर छापे मारुन लूट केली. परंतु यामधील कोणतेही शहर पूर्णत: उध्वस्त करण्यात आले नाही. मुद्दा अगदीच सरळ आहे. एखाद्या ठिकाणाहून नियमित लूट मिळत असेल, तर कोणतेही आक्रमक सैन्य ते उध्वस्त का करेल? तेव्हा त्यामागे केवळ आर्थिक-राजकीय कारण नक्कीच नाही. मात्र त्यासाठी "कुफ्र‘ म्हणजे काय, "शिक्र‘ म्हणजे काय, "बुतशिकन‘ या वैचारिक इस्लाममधील मोठा सन्मान समजल्या जाणाऱ्या संकल्पनेचा अर्थ काय, हे समजून घ्यावे लागेल. इस्लामचा सुवर्णकाळ समजल्या जाणाऱ्या चार खलिफांच्या कार्यकाळातील "प्रेरणादायी परंपरांचा‘ अभ्यास करावा लागेल. शत्रुच्या श्रद्धास्थानावर हल्ला करुन मानसिक खच्चीकरण करणे, हा त्यामागील उद्देश होताच; शिवाय मूर्तिभंजनांसंदर्भात पैगंबरांचा स्पष्ट आदेश असल्याची विकृत मनोभूमिकाही होती. वर्तमान काळातही या भूमिकेस अनुसरुन विध्वंस करत असलेल्या इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेचे उदाहरण वानगीदाखल पाहता येईल. इसिसच्या दहशतवाद्यांनी गेल्या महिन्यामध्ये निमरुड या सध्याच्या इराकमधील प्राचीन शहरामधील अतिदुर्मिळ मूर्ती अक्षरश: घणाचे घाव घालून चक्काचूर केल्या. कृत्य तेच आहे. मात्र आज वर्तमानातील बदललेल्या परिभाषेनुसार आपण त्यांना दहशतवादी म्हणतो. आणि भूतकाळातील अशा प्रकारच्या कृत्यांना आर्थिक इतिहासाची झालर लावण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा मुद्दा महाराजांचे धर्मनिरपेक्ष धोरण हा नाही; तर त्या काळातही ते एक प्रकारच्या जिहादचाच सामना करत होते, हे मान्य करण्याचा आहे. शिवकाळ हा धर्मयुद्धाचा काळ नसेल कदाचित; परंतु शिवशाहीस हिंदुधर्माचा कणा असलेले धार्मिक-सांस्कृतिक अधिष्ठान जन्मत:च लाभले होते, ही बाब सूर्यप्रकाशाइतकी सत्य आहे व याकडे सरसकट दुर्लक्ष करणे, हा निव्वळ कोतेपणा आहे.
शिवकाळ सामाजिक-आर्थिक क्रांतीचा होता, हा मुद्दा मांडताना पानसरे यांनी "मुस्लीम धर्म मानणाऱ्या राजांमध्येही आपसात लढाया होत होत्या,‘ अशी भूमिकाही मांडली आहे. शिवकाळ हा भारतातील विविध साम्राज्यांचा सामर्थ्य वाढविण्यासाठी परस्परांशी केलेल्या संघर्षाचा काळ होता, यात काही शंकाच नाही. परंतु सत्य एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. कडवी सुन्नी सलाफी विचारसरणी अनुसरणाऱ्या औरंगजेबाने दक्षिणेतील आदिलशाही व कुतुबशाही कशा प्रकारे संपविली, ते या पार्श्वभूमीवर पाहणे उद्बोधक ठरेल. औरंगजेबाच्या जिहादच्या आवाहनास विजापूरमधील काही सरदारांनी प्रतिसाद दिल्यामुळे आदिलशाही संपुष्टात आली; तर कुतूबशाही ही तर शियांचीच सत्ता. त्यामुळे एका अर्थी काफीरच. परंतु हे समजून घेण्याआधी शियांचे इस्लामच्या इतिहासातील व सुन्नी मानसिकतेमधील स्थान पहावे लागेल, "तकफीर व खुरुज‘ म्हणजे काय हे पहावे लागेल, इस्लामच्या इतिहासाचाच अभ्यास करावा लागेल. तो कोण करणार?? "इस्लामच्या इतिहासाविषयी सर्वथा अनभिज्ञ असणारा हिंदु समाजासारखा दुसरा समाज पृथ्वीच्या पाठीवर नाही,‘ अशा आशयाचे मानवेंद्रनाथ रॉय यांचे एक विधान आहे. पानसरे यांच्यासारखे लेखक हे वारंवार सिद्ध करत असतात. देशातील इतिहास व सांस्कृतिक परंपरांचे भारतात केले जाणारे विश्लेषण या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तपासून पाहणे फार गरजेचे आहे. मुळात "सगळेच धर्म शांततेची व परस्पर आदराचीच शिकवणूक देतात,‘ या हिंदु धर्माच्या आवडत्या व झापडबंद सूत्राचा त्याग करुन इतिहासाकडे पहावे लागेल. त्याचप्रमाणे, मोगलाईपासून ते भारताच्या फाळणीपर्यंत अखंडत्व लाभलेल्या इस्लाममधील देवबंद मौलवींच्या गुरुशिष्य परंपरेचा अभ्यास करावा लागेल. परधर्म सहिष्णु म्हणून गौरव केल्या जात असलेल्या अकबराच्या "दीन ई इलाही‘ धर्मावर शास्त्रशुद्ध इस्लामी दृष्टिकोनामधून टीका केलेल्या शेख सय्यद अहमद सरहिंदी यांच्यापासून सुरु झालेल्या परंपरेचा अभ्यास केल्याशिवाय शिवकाळाचा वा भारतीय स्वातंत्र्यलढ्याचाही अभ्यास पूर्ण होत नाही. हे सरहिंदी नंतर मुघल साम्राज्याचे धर्मगुरु झाले; त्यांच्या विशुद्ध इस्लामच्या मांडणीस आलेले गोड फळ म्हणजे औरंगजेब होय. या पार्श्वभूमीवर हिंदुच्या राज्यसत्तेमुळे इस्लाम धोक्यात आल्याने अहमद शाह अब्दाली याला जिहादचे आमंत्रण धाडणाऱ्या शहावली उलांचा अभ्यासही करावा लागेल. कोणाला ही पुराणातील वांगी वाटतील. याचा शिवकाळाशी काय संबंध असाही प्रश्न उपस्थित होऊ शकेल. मात्र या प्रश्नाने भारताला गेली अनेक शतके निर्दय सोबत केली आहे, हे वास्तव स्पष्ट करणे आवश्यक आहे. सरहिंदीपासून सुरु झालेली ही देवबंद परंपरा इस्लाममध्ये व आजच्या पाकिस्तानमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
शिवकाळ असो; वा वर्तमान काळ, याच वैचारिक आधारावर पूर्वीच्या लढाया व आत्ताचा दहशतवाद पसरत आहे, हे कोठेतरी मान्य करणे निकडीचे आहे. परंतु हे सर्व कोण करणार?? त्यामुळेच, हिंदुरक्षणासाठी शिवकाळात धर्मयुद्ध झाले अथवा नाही, हा मुद्दा नाही. आजही या इतिहासाचे विश्लेषण आपण केवळ आर्थिक-सामाजिक भूमिकेतून करुन एकतर मोठाच अन्याय करतो आहोत; वा आपण पोथीबंद विचारसरणी अनुसरणारे डावे, समाजवादी आहोत, अशा दोनच शक्यता यामधून उद्भवतात. पानसरे यांच्यासारखे लेखक-इतिहासकार हिंदु राजे प्राय: इस्लामविरोधी नव्हते अशी मखलाशी करत असताना दुसरी बाजु मात्र शिताफीने लपवितात. या पार्श्वभूमीवर भारतीय इतिहास लेखनासंदर्भातील एक अत्यंत धोकादायक प्रवृत्तीकडे लक्ष वेधणे योग्य ठरेल. भारतातील इस्लामी सत्तांसंदर्भात लिहिताना राजकीय इस्लाम व कुराणाच्या अभ्यासाचा पूर्णत: अभाव ही ती प्रवृत्ती होय. पानसरे यांच्यासारख्या लेखकांसंदर्भात ही समस्या आहे. इस्लामचा अभ्यास न करता इस्लामी सत्तांसंदर्भात अज्ञानदर्शी मते मांडणे, हा खरा बुद्धिप्रामाण्यवाद नाही. याचे वर्तमानकाळामधील उदाहरणही पाहता येईल. हदीसचा अभ्यास न करता आपण जगभरातील मुस्लिम देशांमधील समस्यांविषयी मते व्यक्त करतो. परंतु पाकिस्तानसहित जगभरातील 50 पेक्षा जास्त मुस्लिम देशांच्या राज्यघटनेचा वा मूळ राजकीय संरचनेचा मूलाधार हदीस आहे, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. हदीसवर व कुराणावर मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांपैकी किती जण अधिकारवाणीने बोलू शकतील? मुळात याची गरज आहे, असे किती जणांना वाटते? तेव्हा, मोगलाई, आदिलशाही वा इतर कोणत्याही इस्लामी सत्तेसंदर्भात बोलताना मूळ इस्लामचा, हदीसचा थोडा तरी अभ्यास असणे आवश्यक आहे. पानसरे यांच्या या पुस्तिकेवरुन तसे काही दिसत नाही.
पानसरे यांनी महाराजांप्रमाणे काही इस्लामी राजेही सहिष्णु होते, असे नमूद केले आहे. अकबराने जिझीया कर रद्द केल्यामुळे त्याची गणना परधर्म सहिष्णु बादशहांमध्ये करण्यात येते. मात्र अकबर व हेमु यांच्यामध्ये झालेली लढाई ही निव्वळ सत्तावर्चस्वाची नव्हती; तर अकबराने जाणीवपूर्वक स्वीकारलेला तो "जिहाद‘ होता, याचे स्मरण ठेवणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील सर्वसान्य इतिहासकारांपैकी एक असलेल्या सेतुमाधवराव पगडी यांचे यासंदर्भातील लिखाण वाचणे उपयुक्त ठरेल. अकबराच्या काळामध्ये रजपुत सरदारांस मोठ्या संख्येने मोगलाईत समाविष्ट करण्यात आले. या रजपुतांच्या बळकट आधारावरच मोगल साम्राज्य उभे करण्यात आले. त्यामुळे सुरुवातीच्या काळात जिझिया कर आकारुन रजपुतांना दुखाविणे मोगलांना शक्य नव्हते. या पार्श्वभूमीवर औरंगजेबाची कारकीर्द पाहण्यासारखी आहे. शहाजहान मृत्यु पावल्यानंतर मुघल युवराजांमध्ये सुरु झालेल्या संघर्षामध्ये जयसिंहांनी औरंगजेबाची बाजु उचलून धरल्याने त्याला जय मिळाला. यामुळे जयसिंहांस मिर्झा या किताबाने गौरविण्यात आले. अशा बलिष्ट मिर्झा राजे जयसिंह यांचा मृत्यु झाल्यानंतर मोगल फौजांनी काशी विश्वेश्वराचे देऊळ फोडले. तेव्हा रजपुत सरदारांच्या आधाराशिवाय उभे राहण्याची ताकद मोगलांमध्ये आल्यानंतर जिझिया, शरिया सर्वच सुरु झाले. अकबरासही हा मार्ग उपलब्ध असता; तर त्यानेही हेच केले असते. मात्र यासाठी राजकीय इस्लामचा अभ्यास करावयास हवा. अंगी संपूर्ण सामर्थ्य आल्याशिवाय, इतर धर्मीयांविरोधात बळाचा मार्ग शक्यतो टाळावा, अशा आशयाच्या कुराणात आलेल्या आयातींचा अभ्यास करावयास हवा. "मक्का काळ व मदिना काळ‘ या इस्लामच्या एकंदर प्रवासासाठी दीपस्तंभ ठरलेल्या कालखंडाची ओळख असावयास हवी. मात्र हा अभ्यास केल्यास धर्मनिरपेक्षतेच्या माजविलेल्या अवडंबरासच धक्का द्यावा लागेल, ही खरी पोटदुखी आहे.
औरंगजेबाच्याच काळात राज्यकारभाराची सूत्रे निश्चित करण्यासाठी देशभरातील इस्लामच्या प्रकांड पंडितांना आमंत्रण देण्यात येऊन फतवा-इ-आलमगिरी हे तीन खंडांचे विस्तृत साहित्य निर्माण करण्यात आले. यामध्ये तत्कालीन शरियावर चालणाऱ्या राजकारभाराची विस्तृत माहिती आहे. हे तीनही खंड अलिगड विद्यापीठ, उस्मानिया विद्यापीठात; वा देशात अन्य कोठेही मिळतील. मात्र त्याचा अभ्यास करण्यासाठी कुराणाची विस्तृत जाण व फारसीचे ज्ञान आवश्यक आहे. तेवढे साध्य करुन त्या काळातील धार्मिक सहिष्णुतेसंदर्भात मौलिक संशोधन पानसरे यांना करता आले असते. मात्र त्यांनी ते केले नाही, त्यांच्या पूर्वसुरींनी ते केले नाही; व त्यांचे वारसदार ते कदापि करणे शक्य नाही. शिवाय ज्या खाफीखानाच्या लिखाणाचे उदाहरण समाजवादी देत असतात; त्यानेही महाराजांच्या मृत्युनंतर "काफर बा जहन्नुम रफ्त‘ असे उद्गार काढले आहेत. थोडक्यात काफर शिवाजी मृत्युनंतर नरकात गेला, असे खाफीखानाने म्हटले आहे. तेव्हा खाफीखानाने महाराजांची काही ठिकाणी प्रशंसा केली असली; तरी अंतिमत: त्याच्या दृष्टीने व इस्लामी मोगली सत्तेच्या दृष्टीने महाराज श्रद्धाहीन/पाखंडीच होते. यालाच काफर असे म्हटले जाते. यामुळे तत्कालीन इस्लामी सत्तांचा हिंदु राजांबद्दलचा दृष्टिकोन काय होता, यावर यथोचित प्रकाश पडतो. केवळ राज्य महत्त्वाचे असते; तर इतका द्वेष करण्यात आला नसता.
""निजाम, कुतूब व आदिलशाहीत मराठ्यांचे प्राबल्य फार असे. निजामशाहीचा मूळ पुरुष गांगवी हा बहिरंभट कुलकर्णी यांचा मुसलमान झालेला मुलगा होता. अहमदनगरच्या बादशहाचा बाप पण हिंदुच होता. विजापूरचा संस्थापक युसुफ आदिलशहानेही मराठ्याची मुलगी केली होती. बेदरच्या कासीम बरीद या संस्थापकाच्या मुलाने पण साबाजीच्या मुलीशी लग्न केले होते,‘‘ या पारसनीसांच्या "मराठे सरदार‘ या पुस्तकातील उतारा पानसरे यांनी उद्धृत केला आहे. आधीच मत ठरवून इतिहासाबद्दल लिखाण केले, की असे लेखन होते. आदिलशाही, कुतूबशाही बा इतर कोणत्याही सहिष्णु मुसलमान बादशहांनी एतद्देशीय हिंदु मुलींबरोबर लग्ने करुन त्यांना मुसलमान केल्याची शेकडो उदाहरणे इतिहासामध्ये सापडतील. मात्र त्यावरुन ते परधर्म सहिष्णु होते, असा निष्कर्ष काढणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. किती सहिष्णु बादशहांनी वा तत्कालीन इस्लामी सरदारांनी हिंदु सरदारांना आपल्या मुली दिल्या होत्या, हे ताडून पहावयास नको काय? अकबराने जोधाबाईशी लग्न केले, म्हणून तो सहिष्णु; परंतु मोगल वंशातील किती मुस्लीम मुलींनी हिंदु पती केले, हे पहावयास नको काय? विशेषत: दक्षिण भारतात झालेल्या या प्रकारामुळे पोथीबंद इस्लामची धार कमी झाली हे सत्य आहे, परंतु याचा सहिष्णुतेशी काय संबंध? हे निव्वळ राजकारण झाले. दोन्हीकडची उदाहरणे असतील, तरच त्याला सहिष्णुता हे संबोधन लावता येईल. किंबहुना अशी उदाहरणे सहिष्णुतेची नसून; तत्कालीन हिंदु सरदारांनी सत्तेसाठी स्वीकारलेल्या अतिलोचट वृत्तीची आहेत. या एकांगी माहितीवरुन तत्कालीन बादशहा हे परधर्म सहिष्णु होते, हे सिद्ध होत नाही. मात्र स्वार्थी व लाचार हिंदु सरदारांना इस्लामच्या या सामाजिक-सांस्कृतिक आक्रमणाची पुसटशीही जाणीव नव्हती, हे दु:खद सत्य पुढे येते. आजही केवळ त्या नकारात्मक वृत्तीनेच इतिहासाचे विश्लेषण करण्यात येणार असेल; तर आजही हिंदु आपल्या न्यूनगंडामधून बाहेर पडलेले नाहीत, असेच म्हणावे लागेल. याच पार्श्वभूमीवर महाराजांनी केलेले अतुलनीय सामाजिक-सांस्कृतिक कार्य पाहणे संयुक्तिक ठरेल.
महाराज हे केवळ एक सत्तास्थापक नव्हते; तर समाजमनास स्पर्श करणाऱ्या सर्वच क्षेत्रांमध्ये क्रांतिकारक सुधारणेची दृष्टी असलेले द्रष्टे होते. पानसरे म्हणतात त्याप्रमाणे केवळ राज्यच महत्त्वाचे असते, तर महाराजांच्या तेज:पुंज आयुष्याच्या एका सर्वांत मोठ्या घटकाकडे सर्वथा दुर्लक्ष करण्याचे पातक घडेल. केवळ राज्यच महत्त्वाचे असते; तर राज्यकारभारासाठी स्वतंत्र राज्यभाषा कोष तयार करण्याची आवश्यकता होती काय? राज्यकारभारात परकीय फारसीचा झालेला शिरकाव हे महाराष्ट्रावर झालेले एक सांस्कृतिक आक्रमण आहे, या विचाराचा आधार असल्याखेरीज फारसीची हकालपट्टी शक्य नाही. शिवाय, नेताजी पालकरांस समारंभपूर्वक हिंदुधर्मामध्ये परत आणण्याचा निर्णय; वा मुसलमान झालेल्या बजाजी निंबाळकरांस आपली मुलगी देण्याचा निर्णय कोण विसरु शकेल? कोणत्याही धर्मास विशेष महत्त्व नसेल, तर पालकरांना पुन्हा हिंदुधर्मामध्ये घेण्याची काय आवश्यकता होती? दौलतखान वा नूरखानाप्रमाणे मुहम्मद कुलीखानासही सेवेमध्ये ठेवून घेणे शक्य नव्हते काय? धर्मांतर हे संस्कृतींतरच होय, या विचाराचा स्पर्श त्या द्रष्टया राजमनास झाला नसेल काय? आणि केवळ राज्य करणे हाच उद्देश जर असता; तर महाराजांच्या प्रभावळीमध्ये अठरापगड जाती व बारा बलुतेदारी किंबहुना त्याहीपलीकडच्या समाजामधीलही जिवाभावाची माणसे गोळा झाली असती काय? महाराष्ट्रातील सर्व जातीच्या, धर्माच्या लोकांना शिवाजीचे राज्य आपले वाटले, यामागे काय रहस्य आहे? शिवकाळ हा भौतिक दृष्टया महाराष्ट्रातील जनतेसाठी सुखाचा काळ नव्हता. एकामागोमाग एक अशा अनेक राक्षसी आक्रमणांना छोट्याशा राज्यास तोंड द्यावे लागले. अशा कठीण परिस्थितीत स्वराज्याबद्दलची निष्ठा रयतेच्या मनात का टिकून राहिली असावी? महाराजांनी आपल्या आयुष्यात सत्तास्थापनेबरोबरच जे सामाजिक व सांस्कृतिक मन्वंतर घडवून आणले, त्याचाच हा परिपाक आहे. धिर्मशुद्धी व समाजशुद्धीच्या दृष्टीनेही महाराजांचे स्थान क्रांतिकारकाचे व अस्सल धर्मसुधारकाचेच आहे. यामुळेच धर्मशुद्धीच्या व त्या अनुषंगाने महाराष्ट्र धर्माच्या बळकटीच्या विचाराचे अधिष्ठान महाराजांच्या धर्मश्रद्ध मनास असल्याखेरीज स्वराज्यापलीकडील ही सांस्कृतिक, धार्मिक क्रांती संभवत नाही. महाराजांच्या समाज, धर्म सुधारणेचा विचाराचा पुढे पेशवाईमध्ये लवलेश न राहता दांभिक अवडंबर माजले. सर्वसमावेशक हिंदु राष्ट्राची महाराजांची सागरासारखी अथांग दृष्टी पेशवाईस झेपली नाही. यामुळेच पेशवाईस शिवकाळाप्रमाणे नैतिक अधिष्ठान लाभले नाही. तेव्हा शिवरायांचे मोठेपण, शिवरायांचे द्रष्टेपण हे स्वधर्माच्या पुनरुत्त्थानामध्ये व स्वराष्ट्रास पुन्हा नवी ओळख देण्यामध्येही आहे, ही बाब विसरुन चालणार नाही. तेव्हा धर्म व राज्याच्या अतूट बंधनाकडे दुर्लक्ष करुन; वा त्याचा तिरस्कार करुन खरा इतिहास लिहिता येणार नाही.
पानसरे यांनी यांनी शिवकाळाची मांडणी त्यांच्या सोयीनुसार केली, यामध्ये आश्चर्य नाही. भारताच्या स्वातंत्र्यापासूनच हा प्रकार घडत आला आहे. इस्लामची चिकित्सा कोणत्याही परिस्थितीत टाळणे हा तर या स्वघोषित बुद्धिप्रामाण्य वाद्यांचा अत्यंत आवडता छंद आहे. कारण वस्तुनिष्ठता व परखड बुद्धिवाद यांच्या आधाराने केलेल्या इस्लामच्या चिकित्सेमधून येणारी उत्तरे समाजवाद्यांच्या सैद्धांतिक भूमिकेस सोयीची नाहीत. परंतु खरी समस्या दुसरीच आहे. डाव्या परंपरेमधून निर्माण करण्यात आलेल्या इतिहासाच्या दांभिक मांडणीचा शास्त्रशुद्ध प्रतिवाद करणे, काही सन्माननीय अपवाद वगळता स्वत:स हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या विचारवंतांस जमलेले नाही. शिवाय त्यांच्या मांडणीमध्येही खास हिंदु मानसिकतेमधील काही पूर्वग्रह आहेत. शिवाय, डाव्या इतिहासकारांच्या तुलनेमध्ये उजवे मानले जाणाऱ्या इतिहासकारांनीही इस्लाम वा मध्ययुगीन इतिहासासाठी आवश्यक असलेल्या अस्सल साधनांचा अभ्यास किती केला आहे, याविषयी शंका आहेच. यामुळेच भारताच्या इतिहासाविषयी परकीयांनी लिहिलेली पुस्तके, ग्रंथ अधिक विश्वासार्ह मानले जातात. कारण त्यामध्ये संपूर्ण वस्तुनिष्ठता असते, असे नव्हे; तर अभ्यासाच्या दृष्टीने ते हिंदुत्ववाद्यांच्या तुलनेत अधिक परिपूर्ण असतात. तेव्हा पानसरे यांच्यासारख्या डाव्या विचारवंतांची विचारसरणीच देशाचा अधिकृत इतिहास मानण्याच्या घडलेल्या प्रक्रियेस हिंदुत्ववादी म्हणवून घेणारेही तितकेच जबाबदार आहेत, हे बाब ध्यानी घ्यावयास हवी.
-----------------------------------------------------------------------------------------------